महापौरपदाच्या प्रवासात पुरंदरच्या मातीचा स्पर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 11:56 PM2018-08-25T23:56:14+5:302018-08-25T23:56:38+5:30
राहुल जाधव : सासवडमध्ये सत्कार-समारंभात प्रतिपादन
सासवड : माझी राजकीय जडणघडण घडवायला पुरंदरच्या मातीचा स्पर्श महत्त्वाचा आहे. पुरंदरच्या मातीचे ऋण विसरणार नाही. त्यासाठी पुरंदरला अपेक्षित सहकार्य देण्यासाठी नेहमी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पिंपरी-चिंचवडचे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी केले.
पुरंदर तालुका गौरव समितीच्या वतीने सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात महापौर जाधव यांच्या सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी ते बोलत होते. सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी आळंदीच्या नगरसेविका राणी संदीप रासकर यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवानेते संजय जगताप उपस्थित होते. स्पर्धापरीक्षेत उत्तीर्ण होऊन शासनाच्या विविध विभागात अधिकारीपदी निवड झालेल्या; तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या पुरंदरमधील विद्यार्थ्यांचा; तसेच विविध गावांच्या सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे व तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या व्यक्तींचाही सन्मान या वेळी करण्यात आला. याप्रसंगी संजय जगताप यांनी मातीशी असणारी नाळ व आत्मीयता महत्त्वाचे असल्याचे सांगत पुरंदरच्या नैसर्गिक परिस्थितीमुळे येथील जनतेला शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे सांगितले. येथील मुलेही बुद्धिमान आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण झाले असून, पुरंदरच्या तरुणांना नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने साथ द्यावी, अशी मागणी महापौर जाधव यांच्याकडे त्यांनी केली.
याप्रसंगी प्रथमेश कडलक व बाळासाहेब काळे यांनी सत्काराला उत्तर दिले. जि.प.सदस्य व समितीचे अध्यक्ष दत्ता झुरंगे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, पंचायत समिती सदस्य सुनीता कोलते, सोनाली यादव व सासवड नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.