पुणेकरांकडून ४० हजार रोपांची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:09 AM2021-06-26T04:09:42+5:302021-06-26T04:09:42+5:30
पुणे : नागरिकांमध्ये देशी वृक्ष लावण्याकडे कल वाढत चालला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने अल्पदरात उपलब्ध करून दिलेल्या या ...
पुणे : नागरिकांमध्ये देशी वृक्ष लावण्याकडे कल वाढत चालला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने अल्पदरात उपलब्ध करून दिलेल्या या वृक्षांच्या रोपांच्या खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. मागील दहा दिवसांत तब्बल ४० हजार रोपे पुणेकरांनी विकत घेतली आहेत.
पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजीराजे उद्यानामध्ये वनमहोत्सव आयोजिला आहे. १५ जून ते १५ ऑगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ही रोपे पालिकेच्याच वाटिकांमध्ये तयार होत आहेत. ती अत्यंत अल्प दरात नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
उद्यान विभागाने कांचन, मोह, करमळ, जांभूळ, आंबा, कडुलिंब, बदाम, चिंच, करंज, मोहगणी, रोहितक, देवदार, कैलासपती, कवठ, मुचकुंद, पिंपळ, पुत्रवंती, रिठा, सीताअशोक, सुरू, ताम्हण, टेंभुर्णी, कोर्डिया, औदुंबर, अशोक, अर्जुन, आपटा, धावडा, हिरडा, काशीद, करवंद, भेंडी आणि बकान अशा देशी वृक्षांची रोपे अवघ्या पाच रुपयात नागरिकांना उपलब्ध करून दिली आहेत. एकूण ३६ प्रकारची रोपे ठेवण्यात आली आहेत.
या उपक्रमाची वृत्तपत्रातून प्रसिद्धी झाली आणि यासोबतच पर्यावरण प्रेमी नागरिकांनीही ही झाडे नागरिकांनी खरेदी करून त्याची लागवड करावी याकरिता प्रयत्न केले. ही झाडे पालिकेच्या हद्दीत अधिकाधिक लावली जावीत आणि त्यामधून पर्यावरणाचे रक्षण व्हावे असा हेतू असल्याचे उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले.