गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात ७ हजार ४७३ वाहनांची खरेदी
By नितीश गोवंडे | Published: April 9, 2024 02:34 PM2024-04-09T14:34:04+5:302024-04-09T14:34:46+5:30
खरेदी केलेली वाहने घरी नेण्यासाठी पुणेकरांची शहरातील विविध शोरूमवर गुढीपाडव्याच्या दिवशी लगबग पाहायला मिळाली....
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांनी ७ हजार ३३६ इंधनावरील वाहने तर १३७ इलेक्ट्रिक वाहने खरेदी केल्याची नोंद पुणे आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. गुढीपाडवा म्हटलं की, प्रत्येक जण नवीन वस्तूची खरेदी करण्यात गुंतलेला असतो. अनेक जण वाहनांची खरेदीला प्राधान्य देतात. खरेदी केलेली वाहने घरी नेण्यासाठी पुणेकरांची शहरातील विविध शोरूमवर गुढीपाडव्याच्या दिवशी लगबग पाहायला मिळाली.
अनेक जण मनोभावे आपल्या वाहनाची पूजा करून वाहन घरी नेताना दिसले. नवीन खरेदी केलेल्या वाहनासोबतचा फोटोसुद्धा अनेकांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर टाकल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. अनेकांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येलाच आपले वाहन घरी नेले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांनी गेल्या आठ दिवसांपासून वाहन खरेदी करण्याची तयारी केली होती. ही सर्व वाहने पुणेकर सोमवारी आणि मंगळवारी आपापल्या घरी नेण्याच्या तयारीत असणार, हे जाणून पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आणि कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी वर्गाकडून विशेष परिश्रम घेण्यात आले.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी झालेली वाहन संख्या अशी-
मोटारसायकल - ४ हजार २२१
कार - २ हजार ३२४
रिक्षा - २४५
गुड्स - २५७
टॅक्सी - १९०
बस - ४५
इतर वाहने - ५२
एकूण - ७ हजार ३३६