शालेय साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या खात्यात होणार थेट रक्कम जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 01:34 PM2019-05-16T13:34:00+5:302019-05-16T14:00:13+5:30
विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, वह्या व अन्य शालेय साहित्य घेता यावे याकरिता पालिकेने दोन वर्षांपासून थेट पालकांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यास सुरुवात केली..
पुणे : पालिकेच्या शाळा येत्या १७ जूनपासून सुरु होणार असून विद्यार्थ्यांच्या खात्यावर शालेय साहित्याच्या खरेदीसाठी डीबीटीद्वारे रक्कम जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम ३० जूनपर्यंत जमा होईल अशी माहिती शिक्षण प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी दिली.
पालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये ९४ हजार ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बालवाडी पासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश यामध्ये आहे. विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, वह्या व अन्य शालेय साहित्य घेता यावे याकरिता पालिकेने दोन वर्षांपासून थेट पालकांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. त्याआधी पालिका निविदा मागवून शालेय साहित्याचे वाटप करत असे. परंतू, आर्थिक गैरव्यवहार आणि साहित्याचा दर्जा याविषयी शंका उपस्थित होऊ लागल्याने डीबीटी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावर्षी डीबीटीच्या नियोजनाची बैठक अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. बैठकीमध्ये गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या डीबीटी योजनेचा आढावा घेण्यात आला. या योजनेमुळे पालक शहरामधील कोणत्याही दुकानामधून साहित्याची खरेदी करु शकतात. काही पालकांनी जमा झालेले सर्व पैसे खर्च केले नसल्याचेही समोर आले आहे. या योजनेतील त्रुटी दूर करण्यात येणार असल्याचे दौंडकर यांनी सांगितले.
बालवाडीपासून मोठ्या गटापर्यंतच्या १६ हजार विद्यार्थ्यांना इयत्तेप्रमाणे पैसे देण्यात येतात. प्रशासनाकडे एकूण ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या बचत खात्यांची माहिती असून नवीन विद्यार्थ्यांची माहिती शाळा सुरु झाल्यावर घेण्यात येणार असल्याचे दौंडकर म्हणाले.
====
बँकांनी कापले काही पालकांचे पैसे
काही पालकांच्या खात्यावर परिस्थितीमुळे पैसेच नसतात. बँक खात्यामध्ये किमान काही रक्कम ठेवावी लागते. त्यापेक्षा कमी रक्कम असल्यास बँका पैसे कापून घेतात. अनेक पालकांच्या खात्यावर पालिकेने जमा केलेल्या पैशातून बँकेने पैसे कापून घेतले. महापालिका अतिरिक्त आयुक्त बँकाना पत्र पाठवून विद्यार्थ्यांची खाती झिरो बॅलेन्स करावीत अशी मागणी करणार आहेत.
====
गेल्या वर्षी पाच हजार विद्यार्थ्यांची माहिती चुकल्याने पैसे परत आले होते. त्यापैकी चार हजार विद्यार्थ्यांचे पैसे परत त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यावेळी अशी चूक घडू नये याकरिता कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत.