पुणे जिल्हा नियोजन समितीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 02:25 AM2017-08-10T02:25:44+5:302017-08-10T02:25:44+5:30
येत्या काही दिवसांत जिल्हा नियोजन समितीची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सर्वच पक्षातील इच्छुकांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.
पुणे : येत्या काही दिवसांत जिल्हा नियोजन समितीची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सर्वच पक्षातील इच्छुकांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.
जिल्हा परिषदेमध्ये ज्या सदस्यांना पदाधिकारी म्हणून, तसेच स्थायी समिती, अर्थ समितीवर डावलले आहे़ अशा सदस्यांनी जिल्हा नियोजन समितीवर निवडून जाण्यासाठी पक्षाने आपलीच निवड करावी, यासाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे़ गेल्या आठवड्यात जिल्हा नियोजन समितीच्या मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे़ त्यानंतर भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी इच्छुकांकडे मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे़
जिल्हा परिषद अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य असतात़ तसेच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण निर्वाचन क्षेत्रात ७५ मतदार आहेत. त्यातील १७ जागा निवडून द्यायच्या आहेत़ नगरपालिका क्षेत्र म्हणजेच छोटे नागरिक क्षेत्रातून ३९१ मतदार असून त्यातून दोन जागा निवडून द्याव्या लागणार आहेत़ पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातून २८७ मतदार आहेत, त्यांच्यातून २० जागा निवडून द्यायच्या आहेत, अशा एकूण ४० जागांसाठी हा निवडणूक होणार आहे़ या जागा निवडताना नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, एससी, भटक्या विमुक्त जाती-जमाती असे आरक्षण असणार आहे़ जिल्हा नियोजन समितीमध्ये सध्या सर्व आमदार, खासदार विशेष निमंत्रित म्हणून असतात़ तसेच शासन नियुक्त १८ आणि राज्यपाल नियुक्त २ अशा एकूण ६० जागा आहेत़ राष्ट्रवादीकडून जंगम या निवडूण आल्या आहेत़ त्यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना प्राप्त झाल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची कार्यवाही होणार आहे़ या निर्णयाला उच्च न्यायालयात जंगम या आव्हान देऊ शकतात.