'पुरुषोत्तम'ला मुहूर्त मिळेना, विद्यार्थी मात्र स्पर्धेसाठी तयार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 03:16 PM2020-12-18T15:16:11+5:302020-12-18T15:17:03+5:30

महाविद्यालयाच्या कला मंडळातील कलाकार पुरुषोत्तमसारख्या एकांकिका स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात..

Purushottam did not get a moment, but the students were ready for the competition | 'पुरुषोत्तम'ला मुहूर्त मिळेना, विद्यार्थी मात्र स्पर्धेसाठी तयार 

'पुरुषोत्तम'ला मुहूर्त मिळेना, विद्यार्थी मात्र स्पर्धेसाठी तयार 

Next

अतुल चिंचली-
पुणे: आम्ही पुरुषोत्तमची वाट पाहतोय, या स्पर्धेत एक वेगळीच ऊर्जा असते, पुरुषोत्तमसाठीच महाविद्यालयात प्रवेश घेतो, अशा उत्साही वातावरणात विद्यार्थी पुरुषोत्तम स्पर्धेसाठी तयार आहेत. मात्र आयोजक महाविद्यालये सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना पुरुषोत्तमसाठी मुहूर्तच मिळत नाहीये. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टप्याटप्याने सर्व गोष्टी सुरू झाल्या आहेत. त्याबरोबरच चित्रपट, नाटक अशा मनोरंजक गोष्टींनाही परवानगी मिळाली आहे. महाविद्यालये सुरू होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. महाविद्यालयाच्या कला मंडळातील कलाकार पुरुषोत्तमसारख्या एकांकिका स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. जानेवारीत महाविद्यालये सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आशेचा किरण दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतने महाविद्यालयात असणाऱ्या कला मंडळातील विद्यार्थी प्रतिनिधी आणि महाराष्ट्रीय कलोपासकच्या आयोजकांशी संवाद साधला.
............
आम्ही नाटकासाठी महाविद्यालयात जातो. दरवर्षी स्पर्धा ऑगस्टमध्ये असते. त्यामुळे आमच्या मिटिंग मार्च मध्ये होतात. यंदाही मिटिंग झाल्या आहेत. पुरुषोत्तमला दुसरा कुठलाही पर्यायच ठेवता येणार नाही. महाविद्यालयाने सरावाला जागा नाही दिली. तरी आम्ही बाहेर कुठेही सराव करू. आम्ही पुरुषोत्तम होणार याच आशेवर आहोत. 
प्रणव करे, गरवारे वाणिज्य महाविद्यालय 
..........


यंदा आम्ही सिम्बायोसिस, थेस्पो या स्पर्धा केल्या आहेत. काही न काही स्पर्धा करणे सुरू ठेवले आहे. पुरुषोत्तमसाठी आम्ही उत्सुक आहोत. स्पर्धा झाली तर काळजी घेऊन नाटक सादर करू. सध्या तरी पुरुषोत्तमसाठी काही विषय तयार आहेत. आयोजकांच्या निर्णयावर पुढची तयारी सुरू होईल. 
 रितिका श्रोत्री, सर परशुरामभाऊ महाविद्यालय
...............
पुरुषोत्तम स्पर्धेतून वेगळीच ऊर्जा मिळते. स्पर्धा सुरू होणार असेल. तर स्पर्धेत बरेच बदल होण्याची शक्यता आहे. अशा वेळी आमच्याकडून ते बदल स्वीकारून स्पर्धेत उतरण्याची तयारी असेल. विद्यार्थ्यांकडे नाटकांचे विषय असले तरी कमी वेळात नाटक बसवण्याचे आव्हान असेल. 
योगेश सप्रे, बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय
..................
आम्ही कधीपासून या संधीची वाट बघत आहोत. स्पर्धेसाठी एक महिन्याचा कालावधी मिळाला. तरी आम्ही शंभर टक्के प्रयत्नाने नाटक सादर करू. - शौनक जोशी,फर्ग्युसन महाविद्यालय
..............
नाट्यगृहांना परवानगी मिळाली तरी महाविद्यालये अजून सुरू झाली नाहीत. पुरुषोत्तम करंडक एकांकिका ही जिवंत स्पर्धा आहे. महाविद्यालये सुरू झाल्याशिवाय आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. -राजेंद्र ठाकूरदेसाई, चिटणीस, महाराष्ट्रीय कलोपासक

Web Title: Purushottam did not get a moment, but the students were ready for the competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.