सोमेश्वरच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप तर उपाध्यक्षपदी अनंदकुमार होळकर बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 01:02 PM2021-11-08T13:02:44+5:302021-11-08T13:12:15+5:30
सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (someshwar sugar factory) अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप यांची तर उपाध्यक्षपदी अनंदकुमार होळकर यांची ...
सोमेश्वरनगर:बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (someshwar sugar factory) अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप यांची तर उपाध्यक्षपदी अनंदकुमार होळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलने निर्विवाद सत्ता स्थापन केली. यामध्ये भाजप पुरस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही.
आज सोमेश्वर कारखान्यावरील मुख्य कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आज आयोजित केलेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत ही निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी पुरुषोत्तम जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने तर उपाध्यक्षपदासाठी अनंदकुमार होळकर यांचा एकमेव अर्ज आल्याने याठिकाणी या दोघांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष व उपाध्यक्षपद निवडीचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असल्याने पवार यांच्या सुचनेनुसार बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा केली. यावेळी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, संचालक कौस्तुभ चव्हाण, जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य हनुमंत भापकर, पंचायत समिती सदस्य राहुल भापकर आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व मिलिंद टांकसाळे यांनी काम पाहिले.