‘सोमेश्वर’च्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप
By Admin | Published: May 1, 2015 12:01 AM2015-05-01T00:01:50+5:302015-05-01T00:01:50+5:30
येथील सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप यांची फेरनिवड करण्यात आली. तर, उपाध्यक्षपदी उत्तमराव धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोमेश्वरनगर : येथील सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप यांची फेरनिवड करण्यात आली. तर, उपाध्यक्षपदी उत्तमराव धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दि. १७ एप्रिल रोजी सोमेश्वर कारखान्याची निवडणूक पार पडली होती. यामध्ये राष्ट्रवादी पक्ष पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलने एकहाती सत्ता मिळविली होती. त्यानंतर गुरुवारी (दि. ३०) सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडला. त्यानुसार आज सोमेश्वर कारखान्याच्या जिजामाता सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली मासिक सभा पार पडली. या सभेत अध्यक्षपदासाठी पुरुषोत्तम जगताप यांचा, तर उपाध्यक्षपदासाठी उत्तमराव धुमाळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी वसुंधरा बारवे व राहुल काळभोर यांनी अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप यांची, तर उपाध्यक्षपदी उत्तमराव धुमाळ यांची निवड करीत असल्याचे जाहीर केले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती भाऊसाहेब करे, अमृता गार्डी, संचालक रघुनाथ भोसले, अनिल सोरटे, सतीश तावरे, रणजित धुमाळ, नारायण निगडे (सर्व संचालक मंडळ), कामगार, सभासद उपस्थित होते. सोमेश्वर कारखान्यावर असलेले कर्ज ४ वर्षांत फेडणारच, अशी ग्वाही सभासदांना त्यांनी दिली. या वेळी कारखाना कामगार, अधिकारीवर्ग, कामगार पतसंस्था, सोमेश्वर व नीरा पत्रकार गु्रप, सभासद यांच्या वतीने नवनिर्वाचित संचालक मंडळाचे हार घालून सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमात उपाध्यक्ष उत्तमराव धुमाळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, कामागरनेते तुकाराम जगताप, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब काकडे, दादा तांबे, पुरुषोत्तम परकाळे, दिलीप परकाळे, धनंजय खोमणे यांनी मनोगत व्यक्त केले. कैलास जगताप यांनी सूत्रसंचालन तर, बाळासाहेब गायकवाड यांनी आभार मानले.
(वार्ताहर)
माजी कृषिमंत्री शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाकलेली जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी प्रयत्नशील राहू. सभासदांना, कामागरांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील.
- पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर साखर कारखाना