Purushottam Karandak: काहीशी भीती..हुरहूर अन् उत्साहात 'पुरुषोत्तम' करंडक स्पर्धेचा पडदा उघडला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 07:52 PM2022-08-14T19:52:08+5:302022-08-14T19:53:23+5:30
सर परशुरामभाऊ महविद्यालयाच्या ''सिन्स यु आर हिअर'' या एकांकिकेने सुरुवात
पुणे: ''अरे आव्वाज कुणाचा'' चा निनादात दुमदुमलेला आसमंत..मेकअप-वेशभूषासाठी चाललेली तयारी..अन रंगमंचावर पहिल्यांदा सादरीकरण करताना नवोदित विद्यार्थ्यांमध्ये असलेली थोडी भीती, हुरहूर. उत्साह.....अशा वातावरणात रविवारी पुरूषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झाली. भरत नाट्य मंदिरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषात स्पर्धेचा पडदा उघडला. युवा कलाकारांचा अभिनय अन् एकांकिकांची मांडणीने रसिकांची मने जिंकली. महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे आयोजित ५७ व्या पुरूषोत्तम करंडक आंतरमहािद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या जोश आणि जल्लोषाने, गर्दीने भरत नाटय मंदिराचा परिसर फुलून गेला होते .
संघातील विद्यार्थ्यांना चिअर उप करण्यासाठी विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. एकांकिकेत असलेल्या विद्यार्थ्यांनीही मोठ्या आत्मविश्वासाने आणि जोशाने सादरीकरण केले. प्राथमिक फेरीला सायंकाळी 5 वाजता सर परशुरामभाऊ महविद्यालयाच्या ''सिन्स यु आर हिअर'' या एकांकिकेने सुरुवात झाली अन् आव्वाज कुणाचा एस पीचा आवाज सगळीकडे दुमदुमला. त्यानंतर कावेरी महाविद्यालयाची ‘गुमनाम है कोई?’ आणि तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाची (बारामती) ‘भू-भू’ ही एकांकिका प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. पहिल्या दिवशीच्या एकांकिकांमध्ये विषयांची समर्पक मांडणी अन् नेपथ्यापासून ते अभिनयापर्यंत प्रत्येकात वेगळेपण पाहायला मिळाले.
दि २९ ऑगस्टपर्यंत चालणार्या प्राथमिक फेरीत सुमारे ५१ संघांच्या एकांकिका पाहायला मिळणार असून, रोज तीन संघाचे सादरीकरण भरत नाट्य मंदिरात होणार आहे. सोमवारी (दि.१५) कोणत्याही संघाचे सादरीकरण होणार नाही. मंगळवारी (दि.१६) ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे बेडरूम बंद, टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे भिर्रर्र आणि सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्सचे जीवदान या एकांकिका पाहायला मिळणार आहेत.