पुरुषोत्तम करंडक अंतिम फेरी रंगणार शनिवार-रविवारी; पारितोषिक वितरण समारंभ 14 सप्टेंबरला
By श्रीकिशन काळे | Published: September 6, 2023 05:06 PM2023-09-06T17:06:30+5:302023-09-06T17:07:17+5:30
महाअंतिम फेरी डिसेंबरमध्ये...
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 58व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी येत्या शनिवारी (दि. 9) आणि रविवारी (दि. 10) होत आहे. तर पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दि. 14 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
स्पर्धेला शनिवारी सायंकाळी 5 वाजता सुरुवात होणार असून रविवारी सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळात स्पर्धा होणार आहे. त्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी दिली.
अंतिम स्पर्धेत पोहोचलेले संघ : महाविद्यालयाचे नाव आणि कंसात एकांकिकेचे नाव या क्रमाने : अप्पासाहेब जेधे महाविद्यालय (पाईक), झील अभियांत्रिकी महाविद्यालय (परत फिरा रे), आयएमसीसी महाविद्यायल, (मायबाप ..!?), मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय (रवायत ए विरासत), मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड (फेल सेफ), स. प. महाविद्यालय (कृष्णपक्ष), विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, बारामती (पाऊस पाड्या), राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे (पंक्चर पोहे), टिळक आयुर्वेद महाविद्यालय (पिक्सल्स).
विजेत्या संघाचे सादरीकरण :
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 14 रोजी आयोजित करण्यात आला आहे. अंतिम फेरीत पुरुषोत्तम करंडक पटकाविणाऱ्या संघाची एकांकिका सायंकाळी 5 वाजता सादर होणार असून त्यानंतर सायंकाळी 6:30 वाजता ज्येष्ठ रंगकर्मी आणि एशिया पॅसिफिक ऑफ इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटचे (आयटीआय-युनेस्को) उपाध्यक्ष विद्यानिधी वनारसे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे.
महाअंतिम फेरी डिसेंबरमध्ये :
महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे रत्नागिरी, संभाजीनगर, अमरावती-नागपूर आणि कोल्हापूर या विभागातही घेतली जाते. रत्नागिरी केंद्रावरील फेरी पार पडली असून या केंद्रावर 11 एकांकिका सादर झाल्या. संभाजीनगर येथील स्पर्धा दि. 1 ते दि. 3 ऑक्टोबर, अमरावती-नागपूर विभागाची स्पर्धा दि. 5 ते दि. 7 ऑक्टोबर तर कोल्हापूर विभागाची स्पर्धा दि. 26 ते दि. 28 ऑक्टोबर या कालावधीत होत आहे. स्पर्धेची महाअंतिम फेरी डिसेंबरमध्ये पुण्यात होणार आहे.