Purushottam Karandak: ‘भानगड’ची पुरुषोत्तम करंडकावर मोहोर; महाअंतिम फेरीचा निकाल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 10:19 AM2022-12-27T10:19:54+5:302022-12-27T10:20:03+5:30

औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

Purushottam of 'Bhangad' wins trophy; Grand final result announced | Purushottam Karandak: ‘भानगड’ची पुरुषोत्तम करंडकावर मोहोर; महाअंतिम फेरीचा निकाल जाहीर

Purushottam Karandak: ‘भानगड’ची पुरुषोत्तम करंडकावर मोहोर; महाअंतिम फेरीचा निकाल जाहीर

googlenewsNext

पुणे : करंडक कुणाला मिळणार? या प्रश्नाने विद्यार्थ्यांची हुरहूर वाढलेली...सर्वांच्याच काळजाची धडधड वाढली असतानाच ‘भानगड’ या एकांकिकेचे नाव उच्चारताच औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. विशेष म्हणजे, सर्वोत्कृष्ट एकांकिकेसह ‘अभिनय नैपुण्य स्त्री' आणि ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शना'चे पारितोषिकही याच एकांकिकेला मिळाले.

महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे भरत नाट्य मंदिर येथे रंगलेल्या पुरूषोत्तमच्या महाअंतिम फेरीचा निकाल सोमवारी घोषित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी जल्लोष आणि अरे आव्वाज कुणाचा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सांघिक प्रथम क्रमांक औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने तर द्वितीय क्रमांक बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘भू-भू ' या एकांकिकेला तर तृतीय क्रमांक रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘कुपान' या एकांकिकेने पटकावला. साखराळे येथील राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘तुम्ही ऑर नॉट टू मी’ या एकांकिकेला ‘सर्वोत्कृष्ट प्रायोगिक करंडक' मिळाला.

पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभागाचे आयुक्त (सवलत) अभिनय कुंभार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. राजेश पांडे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर उपस्थित होते. संजय पेंडसे (नागपूर), सुबोध पांडे आणि नितीन धुंदके (दोघेही पुणे) यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. सूत्रसंचालन आणि आभार राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी मानले.      

आयुष्यभर कलावंताची मुशाफिरी अनुभवणे हे जगण्याचे मर्म                                            

अभिनेता कसा बोलतो, चालतो, प्रतिसाद देतो, ध्वनी-प्रतिध्वनी कसा उमटतो या सगळ्या बारकाव्यांसहीत स्वत:ला आयुष्यभर आजमावण्याचा प्रवास म्हणजे ‘कलावंत’ होणे असते. कलावंत होणे एकवेळ ठीक आहे; परंतु आयुष्यभर कलावंताची मुशाफिरी अनुभवणे हे जगण्याचे मर्म आहे, असे मत कुंभार यांनी यावेळी मांडले.

रंगधर्मी आणि रंगकर्मी व्हा

नाटक हे एकच माध्यम आहे, जे तुम्ही आहात तसे तुम्हांला दाखवतो. त्यामुळे नाटक महत्त्वाचे आहे, ते करत राहा. रंगधर्मी आणि रंगकर्मी व्हा. - नितीन धुंदके, परीक्षक

परीक्षकांची निरीक्षणे 

- सामाजिक प्रश्नांपेक्षा विद्यार्थ्यांच्या भावविश्वातील विषय हाताळण्याची गरज
- लेखन हा नाटकाचा गाभा, त्यावर अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज
- ध्वनीचा मर्यादित वापर करून वाचिक अभिनयाला अधिक महत्त्व द्यावे
- रंगभूमीची नवीन परिभाषा शोधून प्रस्थापित चौकट मोडणे गरजेचे

अन्य पारितोषिके 

सर्वोत्कृष्ट अभिनय - संस्कार लोहार (बिराड)
अभिनय नैपुण्य पुरुष - सनी पवार (भू-भू)
अभिनय नैपुण्य स्त्री - वैष्णवी काळे (भानगड)
सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य - शौनक कुलकर्णी (गाभारा)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - निखिल नरवडे (भानगड)

उत्तेजनार्थ पारितोषिक

मयुरी निकम (भू-भू), गोविंद रेंगे (भानगड), शुभम गोविलकर (कुपान), आकांक्षा पवार (गाभारा), सुजाता सपकाळ (फराळ), लोकेश मोरे (कंदील), अमितकुमार मांडवे (आम्ही सगळे), स्वानंद कुलकर्णी (कलिगमन), संकेत मुंढे (तुम्ही ऑर नॉट टू मी), रचना अहिरराव (पडदा)

Web Title: Purushottam of 'Bhangad' wins trophy; Grand final result announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.