लवकरच रंगणार पुरुषोत्तम करंडकाचा थरार.... !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 07:14 PM2018-07-12T19:14:03+5:302018-07-12T19:16:33+5:30
महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्षास जूनमध्ये सुरूवात झाल्यानंतर कलाप्रेमी विद्यार्थ्यांना वेध लागतात ते पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे..
पुणे : अरे आव्वाज कुणाचा.. हिप हिप हुर्रे...शिट्या, दर्जेदार विषय, यांतून रंगमंचावर उतरलेला कॉलेजवयीन कलात्मकेचा आविष्कार यांचा सुरेख संगम असलेली व महाविद्यालयीन विश्वाचे अविभाज्य अंग म्हणून परिचित अशा पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या जल्लोषाला लवकरच सुरूवात होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या पुरूषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या प्रवेश अर्जांच्या वाटपाची घोषणा करण्यात आली आहे. उद्या (१४ जुलै) आणि परवा (१५ जुलै) रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत विवेक अपार्टमेंट सुभाषनगर येथे प्रवेश अर्ज उपलब्ध होणार आहेत.
महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्षास जूनमध्ये सुरूवात झाल्यानंतर कलाप्रेमी विद्यार्थ्यांना वेध लागतात ते पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे.. जुलै महिन्यामध्येच स्पर्धेच्या प्रवेश अर्जाच्या वितरणाला सुरूवात होते. त्यानंतर संहिता ठरवून एकांकिकांच्या तालमींचा श्रीगणेशा होतो. येत्या १४ व १५ जुलैला स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या प्रवेश अर्जांचे वाटप केले जाणार आहे. संघांनी महाविद्यालयाच्या लेटर हेडवर चिटणीस, महाराष्ट्रीय कलोपासक यांच्या नावाने तुमच्या महाविद्यालयाला फॉर्म मिळावा असा अर्ज सोबत आणणे आवश्यक आहे.
तसेच लेटर हेड वर महाविद्यालयाचा राउंड शिक्का आणि प्राचायार्ची सही शिक्का असणे अनिवार्य आहे. लेटर हेड वर अर्ज नसल्यास फॉर्म मिळणार नाही, याशिवाय गतवर्षीच्या बॉटम टेन आणि नवीन वेटिंग लिस्टवाल्या महाविद्यालयांनी वरील सर्व बाबी पूर्ण करून १५ जुलै रोजी ७.३० वाजता वरील पत्यावर उपस्थित राहावे सर्वांच्या उपस्थितीत ड्रॉ पद्धतीने प्रवेश अर्ज देण्यात येईल, असेही संस्थेतर्फे सूचित करण्यात आले आहे.