साताऱ्यातील पुसेसावळीचे प्रकरण पूर्वनियोजित, चौकशीनंतरचा निष्कर्ष  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 01:26 PM2023-10-03T13:26:06+5:302023-10-03T13:26:36+5:30

राष्ट्र सेवा दलाच्या सलोखा गटाचा पुढाकार

Pusesawali case in Satara pre planned, conclusion after investigation | साताऱ्यातील पुसेसावळीचे प्रकरण पूर्वनियोजित, चौकशीनंतरचा निष्कर्ष  

साताऱ्यातील पुसेसावळीचे प्रकरण पूर्वनियोजित, चौकशीनंतरचा निष्कर्ष  

googlenewsNext

पुणे : साताऱ्यामध्ये पुसेसावळी येथे एका प्रार्थनास्थळावर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता, असा निष्कर्ष महिनाभराच्या चौकशीनंतर राष्ट्र सेवा दलाच्या सलोखा गटाने काढला. सलोखा गटाच्या साताऱ्यातील कार्यकर्त्यांची राष्ट्र सेवा दलाच्या पुण्यातील मुख्य कार्यालयात शनिवारी (दि. ३०) बैठक झाली. त्यात बोलताना त्यांनी धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या कटाचा हा भाग असल्याचा गंभीर आरोप केला. यासंदर्भात सेवा दलाच्या वतीने मुख्यमंत्री व अन्य वरिष्ठांना लेखी निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

पुसेसावळीत महिनाभरापूर्वी काही समाजविघातक शक्तींनी स्थानिक प्रार्थनास्थळावर हल्ला करून तिथे जमलेल्यांना मारहाण केली. नुरुल हसन या अभियंता तरुणाचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर सेवा दलाच्या सलोखा गटाचे तेथील कार्यकर्ते मिनाज सय्यद यांनी स्थानिक नागरिकांची भेट घेऊन, घटनास्थळी जाऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. या गटाचे काही कार्यकर्ते, स्वत: मिनाज सय्यद, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष नितीन वैद्य तसेच अन्य २५ कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

पुसेसावळी येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यात यावी. ज्या व्यावसायिकांचे नुकसान झाले त्यांना मदत मिळावी, जखमींच्या वैद्यकीय खर्चाची भरपाई मिळावी, दोषी व्यक्तींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा मागण्या सलोखाच्या वतीने सातारा प्रशासनाकडे करण्यात आल्याचे मिनाज यांनी सांगितले.

अशा घटना घडल्यानंतर बहुसंख्य गटाने अल्पसंख्याक गटाबरोबर उभे राहणे, त्यांना दिलासा देणे आवश्यक असते. यातून घटना झाल्यानंतरची तीव्रता कमी होण्यास मदत होते. राष्ट्र सेवा दल आणि सलोखा गट राज्यात अशा घटना घडल्यानंतर या प्रकारे प्रयत्न करणार आहे. - प्रमोद मुजुमदार- विश्वस्त राष्ट्र सेवा दल, समन्वयक, सलोखा गट

Web Title: Pusesawali case in Satara pre planned, conclusion after investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.