पुरंदर तालुक्यात प्रस्थापितांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:11 AM2021-01-19T04:11:33+5:302021-01-19T04:11:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जेजुरी: पुरंदर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीची प्रक्रिया आज पार पडली. या निवडणुकीत गावोगावच्या प्रस्थापितांना मतदारांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी: पुरंदर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीची प्रक्रिया आज पार पडली. या निवडणुकीत गावोगावच्या प्रस्थापितांना मतदारांनी धक्का देत पराभवाची चव चाखवली आहे.
पुरंदर तालुक्यातील दिवे शासकीय तंत्रनिकेतन इमारतीत ५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतमोजणी पार पडली. तालुक्यातील एकूण ६८ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात पिंगोरी ग्रामपंचायत वगळता १२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. पिंगोरी ग्रामस्थांनी विकासकामे झाली नसल्याने निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. उर्वरित ५५ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतींमधील जागा ही बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ४१७ जागांसाठी ८९३ उमेदवारांसाठी आज मतमोजणी झाली. या मतमोजणीतून मतदारांनी गाव प्रतिष्ठितांना नाकारल्याने स्पष्ट झाले आहे.
निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीचा प्रभाव चांगलाच जाणवला. राज्यात महाविकास आघाडी असल्याने आज तरी कोणती ग्रामपंचयात कोणत्या पक्षाची आली हे आज तरी म्हणता येणार नाही. गावपातळीवरून झालेल्या या निवडणुकात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप या चारही पक्ष कार्यकर्त्यांनी गावपातळीवर वेगगवेगळ्या आघाड्या करीत निवडणुकीत पॅनल उभे केले होते. सरपंचपदाच्या निवडणुकीनंतरच अधिकृत पक्षाची ग्रामपंचायत हे सिद्ध होणार आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेनेत या निवडणुकीत चांगलीच चुरस दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच बँकफूटवर गेली आहे. पक्षांच्या तालुकास्तरावरील नेत्यांना आपल्या ग्रामपंचायती राखता आल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांना त्यांच्या पिसर्वे ग्रामपंचायतीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांचे बंधू सुरेश कोलते यांचा निवडणुकीत पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे यांना त्यांची वाळुंज ग्रामपंचायत राखता आली नाही, तर दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य व बांधकाम समिती सभापती दत्ताजी चव्हाण यांना स्वतः पराभव स्वीकारावा लागलाच शिवाय ग्रामपंचायतही राखता आली नाही. राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी त्यांच्या जवळार्जुन ग्रामपंचायतीत एक हाती सत्ता मिळवली. तर माजी मंत्री विजय शिवतारे यांना त्यांची परींचे ग्रामपंचयात आपल्याकडेच राखण्यात यश आले आहे. पुरंदर तालुक्यातील काळदरीचे आदर्श सरपंच अंकुश परखंडे तसेच धालेवाडीचे आदर्श सरपंच संभाजी काळाने यांना ही निवडणुकीत आपल्या ग्रामपंचायती राखता आल्या नाहीत. भाजपचे नेते बाबा जाधवराव यांनी ही आपली दिवे ग्रामपंचायत राखली आहे. खळद येथील नीरा मार्केट कमिटीचे माजी सभापती बाळासाहेब कामथे यांना ही आपली खळद ग्रामपंचायत राखता आली नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिक झेंडे यांनी मात्र काँग्रेसच्या मदतीने पांडेश्वर ग्रामपंचायतीत निर्विवाद यश मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संदीप चिकणे यांनी ही नाझरे क. प. ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. एकीकडे तालुका पातळीवरील नेत्यांच्या गावातून मोठी पडझड झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. या नेत्यांना आत्मचिंतनाची आवश्यकता आहे. या निवडणुकीत गाव पुढाऱ्यांना मतदारांनी चांगलाच धडा शिकवला आहे. जवळजवळ सर्वच ग्रामपंचायतीत त्याच त्या गावपुढाऱ्यांना मतदारांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. संपूर्ण निवडणूक ही तरुणांनी हातात घेतल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. मतमोजणीनंतर युवकांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.