बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला धक्का

By admin | Published: October 20, 2014 02:16 AM2014-10-20T02:16:50+5:302014-10-20T02:16:50+5:30

तालुक्यातील नेत्यांनाच एकमेकांत झुंजवत ठेवून स्वत:चे महत्त्व अबाधित राखण्याची राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेतृत्वाची खेळी पुणे जिल्ह्यातच त्यांच्यावर उलटली.

Push the NCP in the citadel | बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला धक्का

बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला धक्का

Next

पुणे: तालुक्यातील नेत्यांनाच एकमेकांत झुंजवत ठेवून स्वत:चे महत्त्व अबाधित राखण्याची राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेतृत्वाची खेळी पुणे जिल्ह्यातच त्यांच्यावर उलटली. त्यामुळे राज्यात इतरत्र बरी कामगिरी करत असताना पुण्याच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला जबर धक्का बसला.
राष्ट्रवादीच्या गेल्या वेळी जिल्ह्यात ६ जागा होत्या. त्या या वेळी अर्ध्याच झाल्या. इंदापूरमधील प्रतिष्ठेची जागा आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळाले असले तरी जुन्नर, खेड, शिरूर आणि दौंड या जागा राष्ट्रवादीला गमवाव्या लागल्या. अपेक्षेप्रमाणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी विजय मिळविला असला तरी इतरत्र मात्र राष्ट्रवादीला जबर पराभव पत्करावा लागला.
विशेष म्हणजे खेड आणि दौंडमध्ये राष्ट्रवादीच्याच बंडखोरांनी इतर पक्षांत प्रवेश करून विजय मिळविला. खेडमध्ये गेल्या वेळी तिकीट देऊनही दिलीप मोहिते यांच्या दबावाखाली ऐनवेळी सुरेश गोरे यांना उमेदवारी नाकारली. मोहिते यांच्या विरोधात तालुक्यातील नेत्यांनीच परिवर्तन आघाडी उघडली होती. त्यातील गोरे शिवसेनेकडून आणि शरद बुट्टे-पाटील हे भाजपकडून लढून राष्ट्रवादीच्या पराभवाचे कारण ठरले. दौंडमध्ये कुल-थोरात या गटाला एकत्र करण्यात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला अपयश आले. त्यामुळे कुल यांनी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करून विजय मिळवित राष्ट्रवादीला धक्का दिला. शिरूरमध्ये बाबूराव पाचर्णे यांना गेल्या वेळी पक्षात घेऊन ऐनवेळी तिकीट नाकारले. त्या नाराजीतून गेल्या वेळच्या पराभवाचा वचपा त्यांनी यंदा भाजपची उमेदवारी घेऊन काढला. जुन्नरमध्ये तर राष्ट्रवादीचे अतुल बेनके तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. येथे मनसेचे शरद सोनवणे यांनी अनपेक्षितपणे बाजी मारली.
इंदापूरची जागा प्रतिष्ठेची करून राष्ट्रवादीने हर्षवर्धन पाटील यांना कोंडीत पकडले होते. सर्व ताकद पणाला लावून हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. कॉँग्रेसला जिल्ह्यात केवळ भोरमध्ये संग्राम थोपटे यांच्या रूपाने अस्तित्व टिकविता आले आहे. पुरंदरमध्ये राष्ट्रवादीचे तब्बल २९ इच्छुक होते. त्यामुळे एकत्रित प्रचार झालाच नाही आणि अशोक टेकवडे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. कॉँग्रेसचे संजय जगताप यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. मावळमध्ये राष्ट्रवादी प्रथमच एकत्रित लढत होती. मात्र, कॉँग्रेसने घेतलेली मते आणि मोदीलाटेमध्ये माऊली दाभाडे यांचा टिकाव लागला नाही. भाजपचे बाळा भेगडे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला. चार महिन्यांत तीन वेळा पक्षांतर करणारे लक्ष्मण जगताप चिंचवडमधून विजयी झाले. भोसरीतून गेल्या वेळी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विलास लांडे यांना यंदा अपक्ष महेश लांडगे यांनी पराभूत केले. (प्रतिनिधी)

Web Title: Push the NCP in the citadel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.