पेठ येथे पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:10 AM2021-01-18T04:10:35+5:302021-01-18T04:10:35+5:30
मंचर : रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले हॉटेल बंद करण्यास सांगणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना पेठ ...
मंचर : रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले हॉटेल बंद करण्यास सांगणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना पेठ गावच्या हद्दीत हॉटेल हेरिटेज येथे घडली. याप्रकरणी मंचर पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
सचिन इंदोरे व प्रमोद इंदोरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांचा आदेश डावलून पेठ येथील हॉटेल हेरिटेज रात्री उशिरापर्यंत चालू असल्याने मंचर पोलिसांनी ते बंद करण्यास सांगितले. त्यावेळी सचिन शिवाजी इंदोरे व प्रमोद इंदोरे यांनी पोलिसांना शिवीगाळ करून त्यांना मारहाण करत दमदाटी केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी सुदर्शन सुखदेव माताडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी रोजी आंबेगाव तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन शिंदे, पोलीस जवान सुदर्शन माताडे, होमगार्ड कुंभार व धुमाळ सर्व ढाबे, हॉटेल, पानटपरी रात्री दहाच्या आत बंद करण्याच्या सूचना असल्याने पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे पुणे-नाशिक महामार्गावर पेट्रोलिंग करत होते. पेठच्या हद्दीत हॉटेल हेरिटेज रात्री सुरू असल्याचे त्यांना आढळले. त्यावेळी त्यांना सायरन वाजवून हॉटेल बंद करणेबाबत सूचना दिल्या. हॉटेल मालकाने गाडीजवळ येऊन ‘हॉटेल बंद करणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा’ असा दम दिला. त्यावेळी त्यांनी त्याचे नाव सचिन शिवाजी इंदोरे (रा. चांडोली ता. आंबेगाव) असे सांगितले. ‘ तुम्हाला काय करायचे ते करा मी तुमच्याबरोबर येणार नाही’ असे म्हणून हॉटेल हेरिटेजमधील काऊंटर वरून दुसऱ्या इसमास बोलावून घेऊन त्या दोघांनी मंचर पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सचिन इंदोरे यांनी पोलीस जवान सुदर्शन माताडे यांना मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केली. तर प्रमोद इंदोरे याने सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन शिंदे यांना हाताने ढकलून देऊन त्या ठिकाणावरून पळून गेला. पोलिसांना दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सचिन इंदोरे व प्रमोद इंदोरे या दोघांविरुद्ध सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद पोलीस सुदर्शन माताडे यांनी दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.