टेकड्या जाळणाऱ्या विकृतींना चाप बसवा; चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला संताप
By राजू हिंगे | Updated: January 7, 2025 20:45 IST2025-01-07T20:43:43+5:302025-01-07T20:45:00+5:30
- झाडांच्या सुरक्षेसाठी १३ जानेवारी रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

टेकड्या जाळणाऱ्या विकृतींना चाप बसवा; चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला संताप
पुणे :कोथरूडमधील म्हातोबा टेकडीवरील आगीच्या घटनेमुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील संतप्त झाल्याचे दिसले. या विकृतींना चाप बसविण्याचे निर्देश पुन्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच, झाडांच्या सुरक्षेसाठी उपाय योजनांसंदर्भात १३ जानेवारी रोजी वन विभागाच्या मुख्यालयात बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त कोथरूडमधील म्हातोबा, पाषाण, महात्मा टेकडीवर औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्त्वाचे ठरणाऱ्या वृक्षांची लागवड केली. गेल्या आठवड्यात तीन वेळा म्हातोबा टेकडीवर येणाऱ्या काही टवाळखोरांनी आग लावून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून आढावा घेतला.
यावेळी वन विभागाचे अधिकारी मुख्य वनसंरक्षक मनोज बारबोले, सहायक उपवन संरक्षक दीपक पवार, भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सरचिटणीस दीपक पवार, दिलीप उंबरकर, सचिन मोकाटे, म्हातोबा टेकडी ग्रुपचे दामोदर कुंबरे, रोहिदास सुतार, दंडवते मारुती टेकडी ग्रुपचे संजीव उपळेकर, गणेश आंग्रे, जयंतराव पेशवे, राजू इनामदार, तात्यासाहेब निकम, विश्वास कुलकर्णी, निसर्गप्रेमी रमेश दांडेकर यांच्यासह पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
या पाहणी वेळी बारबोले यांनी घटनेची माहिती पाटील यांना दिली. त्यावर घटना घडू नये, यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, अशी विचारणा केली. त्यावर मनुष्यबळ अभावामुळे अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यात मर्यादा येत असल्याचे अधिकाऱ्यांनी पाटील यांच्यासमोर स्पष्ट केले. त्यावर लोकसहभागातून मनुष्यबळ उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.
सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही
लोकसहभागातून मनुष्यबळ वाढविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली. तसेच, गस्त वाढविण्यासाठी होमगार्डची मदत घ्यावी अशी सूचना त्यांनी केली. त्यासोबतच झाडांच्या सुरक्षेसाठी प्रशासनासमोरच्या इतर अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यासाठी १३ जानेवारी रोजी बैठक घेणार असल्याचेही स्पष्ट केले. यामध्ये प्रशासन आणि पर्यावरण प्रेमींसोबत संवाद प्रस्थापित करून वृक्ष संवर्धनामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.