गावच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:21 AM2021-02-21T04:21:57+5:302021-02-21T04:21:57+5:30
खोडद : "गावच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे यावे.गावचा विकास करणे हेच अंतिम ध्येय ठेवून त्यासाठी ...
खोडद : "गावच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे यावे.गावचा विकास करणे हेच अंतिम ध्येय ठेवून त्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करावा.शासनाच्या विविध योजना तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत." असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
पुणे येथे स्मार्ट व्हिलेज आर. आर. आबा पाटील गाव सुंदर योजना सन २०१९ - २० च्या तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथील अल्पबचत भवन येथे झाले.यावेळी उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे,उपसभापती रमेश खुडे व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली मांजरवाडी गावात विविध विकासकामे व गावात सुशोभीकरण करण्यात आले.स्मार्ट व्हिलेज आर.आर.आबा पाटील गाव सुंदर योजना सन २०१९ - २० चातालुकास्तरीय पुरस्कार मिळविण्यासाठी तत्कालीन सरपंच सूर्यकांत थोरात,माजी उपसरपंच जयसिंग थोरात,केरभाऊ गायकवाड, ग्रामसेवक सचिन बनकर,भुपेंद्र कांदळकर तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष प्रयत्न केले होते.ग्रामसेवक सचिन बनकर भाऊसाहेब यांचे काम करण्याची पद्धत आणि वसा सध्याचे ग्रामसेवक भूपेंद्र कांदळकर यांनी पुढे अविरत चालू ठेवला याबाबत ग्रामस्थांनी भूपेंद्र कांदळकर यांच्या कामाविषयी कौतुक करत आहेत.
स्मार्ट व्हिलेज आर.आर.आबा पाटील गाव सुंदर योजना सन २०१९ - २० चा जुन्नर तालुक्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मांजरवाडी ग्रामपंचायतला प्रदान करण्यात आला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे,मावळचे आमदार सुनील शेळके,आदी मान्यवर उपस्थित होते.मांजरवाडी ग्रामपंचायतला मिळालेला पुरस्कार सरपंच मनीषा मुळे, उपसरपंच संतोष मोरे,ग्रामसेवक भूपेंद्र कांदळकर यांनी अजित पवार यांचे हस्ते स्वीकारला.
स्मार्ट व्हिलेज सन २०१९ - २० चा जुन्नर तालुक्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते स्वीकारताना मांजरवाडीच्या सरपंच मनीषा मुळे, उपसरपंच संतोष मोरे,ग्रामसेवक भूपेंद्र कांदळकर.