दंडेलशाहीतून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला

By admin | Published: October 13, 2016 02:37 AM2016-10-13T02:37:03+5:302016-10-13T02:37:03+5:30

ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे आणि लेखिका प्रज्ञा पवार यांना साहित्य संमेलनात मिळालेली वागणूक अयोग्यच आहे. भाषणाबाबतच्या प्रतिक्रिया तातडीने उमटायला हव्या होत्या,

Put the expression out of penal freedom on freedom | दंडेलशाहीतून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला

दंडेलशाहीतून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला

Next

पुणे : ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे आणि लेखिका प्रज्ञा पवार यांना साहित्य संमेलनात मिळालेली वागणूक अयोग्यच आहे. भाषणाबाबतच्या प्रतिक्रिया तातडीने उमटायला हव्या होत्या, विरोधासाठी दुसरा दिवस का उजाडला? अशा माध्यमातून लेखन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणे हा दंडेलशाहीचाच एक प्रकार आहे, अशा शब्दांत माजी संमेलनाध्यक्ष आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.

मराठी साहित्य संमेलन आणि लेखकाचे सत्व यांचा संबंध संपून बरीच वर्षे झाली. गेली काही वर्षे ही विभागीय साहित्य संमेलने परिघाबाहेरच्या लोकांना आत घेण्याच्या उद्देशाने, प्रागतिक विचार व विचारवंत, साहित्यिक यांना विशेष निमंत्रित केले जाते. पाटणलाही फुले, आंबेडकरांच्या नावे रावसाहेब कसबे व प्रज्ञा पवार यांना बोलावून त्यांना ज्या प्रकारे परागंदा व्हायला लावले, त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच. स्वागताध्यक्षांच्या पैशावर,त्यांच्या तालावर चालणारी संमेलने ताठ बाणा, कणा ठेवण्याचा नैतिक अधिकार केव्हाच गमावून बसलीत.
- संजय पवार, लेखक


पाटणमध्ये घडलेल्या घटनेबाबत काहीही माहिती नाही, इतकंच सांगू इच्छितो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे शिष्टसंमत नाही. अशाप्रकारे विचार दाबला जात आहे, याचा मी निषेध करतो.
- गंगाधर पानतावणे, ज्येष्ठ विचारवंत

विभागीय साहित्य संमेलनातील अध्यक्ष आणि उद्घाटकाचे भाषण आक्षेपार्ह वाटले असेल, तर त्याच दिवशी त्याचा विरोध व्हायला पाहिजे होता. नंतर खुसपट का काढण्यात आले? हा एक दंडेलशाहीचाच प्रकार आहे. विचारांनी विचार खोडता आला पाहिजे. या माध्यमातून लेखन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. संयोजकांनी विरोधकांशी संवाद घडवून आणणे महत्त्वाचे होते. हे प्रकार असेच घडत राहिले, तर कुणीही विवेचन करण्याचे धाडस यापुढील काळात करणार नाही. - प्रेमानंद गज्वी, ज्येष्ठ नाटककार


विचारवंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणे केव्हाही योग्य नाही. इतिहास विवेकाने लिहावा, वाचावा; विवेकाने त्याचे मूल्यमापन व्हावे, इतिहासाबाबत विवेकाने बोलावे आणि श्रोत्यांनी विवेकाने इतिहास ऐकावा. कारण, इतिहासाच्या अनुबंधामध्ये आणि परिक्षेत्रामध्ये विवेक अत्यंत आवश्यक आहे. विवेकी मूल्यांसाठी प्रत्येक कालखंडात अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्विवाद असले पाहिजे.
- डॉ. श्रीपाल सबनीस, अध्यक्ष साहित्य संमेलन

पाटणमधील विभागीय साहित्य संमेलनामध्ये रावसाहेब कसबे आणि प्रज्ञा दया पवार यांना मिळालेली वागणूक अयोग्य आहे. संमेलनातील घटनेबाबत मिळालेल्या तपशिलानुसार, रावसाहेब कसबे यांच्या भाषणाबाबतच्या प्रतिक्रिया तातडीने उमटायला हव्या होत्या. मात्र, विरोध करण्यासाठी दुसरा दिवस उजाडला. कोणत्याही लेखकाचे, साहित्यिकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, यात शंकाच नाही. लेखकांना बोलण्याचा, त्यांची भूमिका मांडण्याचा पूर्ण हक्क आहे.
- प्रा. वसंत आबाजी डहाके, साहित्यिक


रावसाहेब कसबे यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांबाबत कोणतीही मांडणी नव्याने केलेली नाही. कॉ. शरद पाटील यांनी याआधी अशा प्रकारची मांडणी केली होती. कसबे यांनी केवळ तीच मांडणी उद्धृत केली. तरीही, त्यांच्या भूमिकेला झालेल्या विरोधाचा आणि गळचेपीचा मी तीव्र निषेध करते. एकीकडे शिवाजीमहाराजांचा चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यांना क्लिनचिट दिली जाते आणि दुसरीकडे याबाबतच्या मांडणीला विरोध केला जातो. कसबे यांच्या भूमिकेला झालेला विरोध हा लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला हल्ला आहे. हा सांस्कृतिक दहशतवाद निषेधार्ह आहे. आजवर साहित्य महामंडळ, साहित्य परिषद यांनी कधीही लेखकांची बाजू लावून धरलेली नाही. या संस्था म्हणजे ब्राह्मणी भांडवली आणि पुरुषसत्ताक मूल्यांच्या पुरस्कर्त्या आहेत. त्यांची निवडणूक प्रक्रिया, व्यवहार लोकशाहीविरोधी आहे. त्यामुळे त्यांच्या साहित्य संमेलनांवर बहिष्कार घालत सर्वांनी आपापली संमेलने भरवावीत. या वादाच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब कसबे यांनी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असे वाटते.
- प्रतिमा परदेशी, साहित्यिक


पाटणसारख्या घटनांमधून हे कळते की अजून समाजमन समृद्ध झालेले नाही. आपले विचार खुलेपणाने मांडायची मानसिकताच हरपली आहे. परिवर्तनाची वाट नेहमीच संघर्षातून जाणारी असते, तरीही परिवर्तन अटळ असते. यापद्धतीने संमेलन मोडली गेली, तर कुणीच संमेलन भरविणार नाही. संस्थात्मक कार्य करणाऱ्या लोकांना जबाबदारीने निर्णय घ्यावे लागतात.
- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, साहित्य परिषद
पाटणच्या विभागीय साहित्य संमेलनामध्ये मी व्यक्तिश: उपस्थित नव्हतो. त्यामुळे तेथे नेमके काय घडले, हे मला माध्यमांमधूनच समजले. मात्र, कोणत्याही लेखकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जात असेल, तर ही बाब नक्कीच निषेधार्ह आहे. साहित्यिकांच्या भूमिकेला होणारा विरोध समाजाला मागे घेऊन जाणारा आहे. कसबे विचारवंत आणि जबाबदारीने बोलणारे व्यक्तिमत्त्व आहे. ते राष्ट्रपुरुषांचा अपमान कदापि करणार नाहीत, अशी माझी खात्री आहे.
- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, साहित्यिक

Web Title: Put the expression out of penal freedom on freedom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.