पोलिसांच्या कानशिलात; बारामती राष्ट्रवादी लोकसभा डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ. वंदना मोहितेंना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 09:59 AM2023-06-16T09:59:55+5:302023-06-16T10:00:41+5:30
वारीनिमित्त पोलीस पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्याचे कर्तव्य बजावत होते
केडगाव: केडगाव ता.दौंड येथील बारामती राष्ट्रवादी लोकसभा डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉक्टर वंदना मोहिते यांच्यावर कर्तव्य बजावत असताना पोलिसाला कानशिलात लगावल्या प्रकरणी यवत पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात पोलीस नाईक नितीन भानुदास कोहक यांनी फिर्याद दिली आहे. सदर घटना गुरुवार दिनांक १५ रोजी दुपारी २.३० ते ३.०० वाजता सुमारास कासुर्डी टोल नाका येथे घडली.
कासुर्डी या ठिकाणी फिर्यादी पोलिस नाईक नितीन कोहक व त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक रोकडे हे शासकीय कामावर हजर असताना आषाढी वारीनिमीत्त पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्याचे कर्तव्य बजावत होते. त्याचवेळी एका करड्या रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारमध्ये येत डॉ.मोहिते यांनी पुण्याकडे जाताना पोलीसाशी हुज्जत घातली. व नितीन कोहक यांच्या डाव्या गालावर कानशिलात लगावली. त्यानंतर डॉ.मोहिते गाडीतून खाली उतरून बॅरिगेटिंग बाजूला काढत पुण्याच्या दिशेने निघून गेल्या. यवत पोलिसांनी शासकीय कामकाजात अडथळा केल्या प्रकरणी मोहिते यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. तसेच मोहिते यांच्यावर ३५३,३२३,३३२ कलमाप्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यवत पोलिसांनी मोहिते यांना गुरुवारी रात्री राहत्या घरातून अटक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने व सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे कामकाज पाहत आहेत.