पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:14 AM2021-01-16T04:14:15+5:302021-01-16T04:14:15+5:30

मंचर : पुणे- नाशिक रेल्वेला भारतीय रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर राज्य शासनाने या प्रकल्पाला मंजुरी देत प्रकल्पातील २० टक्के ...

Put the proposal of Pune-Nashik semi high speed railway project before the Cabinet | पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवा

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवा

Next

मंचर : पुणे- नाशिक रेल्वेला भारतीय रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर राज्य शासनाने या प्रकल्पाला मंजुरी देत प्रकल्पातील २० टक्के म्हणजेच तीन हजार २०८ कोटी रुपये खर्चाचा वाटा उचलावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत प्रकल्पाला राज्याकडून ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

आढळराव पाटील म्हणाले की, गेल्या १५ वर्षांपासून मी सातत्याने विविध स्तरावर पुणे-नाशिक रेल्वेसाठी पाठपुरावा केल्यानंतर २०१६ ला या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. त्यानंतर राज्यातील प्रकल्पांच्या कार्यन्वयनासाठी महारेलची स्थापना झाली. याद्वारे राज्यातील पहिल्या तीन प्रकल्पांमध्ये तसेच ब्रिटिशकालीन रेल्वे बोर्डाच्या पिंकबुकमध्येही १६ हजार ३९ कोटी रुपये किमतीच्या हायस्पीड पुणे-नाशिक रेल्वेचा समावेश करण्यात आला. या प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी द्यावी यासाठी फेब्रुवारी २०२० मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आग्रही मागणी केली व या प्रकल्पाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच यासंबंधीची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर सुरू झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने ही प्रक्रिया पुढे सहा-सात महिने लांबणीवर पडली.

गेली तीन महिने पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा पाठपुरावा सुरू केल्याने गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव संजीव कुमार, परिवहन विभागाचे सचिव आशिष कुमार सिंग, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या कृषी व औद्योगिक क्षेत्राला लाभदायक ठरणाऱ्या या प्रकल्पाची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देत ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. लवकरच या प्रकल्पाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळून माझ्यासह या भागातील नागरिकांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरेल, अशी अपेक्षा यावेळी शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.

Web Title: Put the proposal of Pune-Nashik semi high speed railway project before the Cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.