शेतकऱ्यांच्या एका खिशात पैसे टाकुन दुसऱ्या खिशातून दुप्पट काढून घेणे; ही पाकीटमारी बंद करा- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 01:35 PM2024-04-19T13:35:11+5:302024-04-19T13:35:54+5:30
अमित शहा नावाचे गृहस्थ गेल्या दहा वर्षात शरद पवार यांनी काय केल याचा हिशोब मागतात, सत्तेत मी नसताना हिशोब मात्र मला मागतात,
बारामती: भाजप सरकारने शेतकऱ्यांचा शेतीमाल दुध, साखर स्वस्त केले. तर दुसऱ्या बाजुला इंधनाच्या किंमती वाढविल्या. शेतकरी पिकवितात ते स्वस्त आणि दुसरे पिकवितात, ते महाग करण्याचे केंद्राने धाेरण राबविले. शेतकऱ्यांच्या एका खिशात पैसे टाकुन दुसऱ्या खिशातून दुप्पट पैसे काढुन घेतले जातात. ही एक प्रकारची पाकीटमारी आहे. पाकीट मारीची पध्दत बंद करण्यासाठी निर्णय घेणारा बाजुला करण्याची गरज असल्याची टीका पवार यांनी केद्र सरकारवर केली.
कन्हेरी (ता.बारामती) येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, अमित शहा नावाचे गृहस्थ गेल्या दहा वर्षात शरद पवार यांनी काय केल याचा हिशोब मागतात. गेल्या दहा वर्षात सत्ता कोणाची आहे, मंत्री कोण आहे. मी सत्तेत नव्हतो, पण हिशोब मात्र मला मागतात, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना लगावला.
पवार पुढे म्हणाले, मोदी फडवणीस यांच्यासह अन्य नेते आमच्या विरोधात घटना बदलण्याचा खोटा प्रचार सुरु असल्याचे सांगतात. मात्र, त्यांचेच मंत्री घटना बदलणार असल्याचे सांगतात. घटना बदलण्याचा विचार गंभीर आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला अधिकार महत्वपुर्ण आहे. त्यासाठी सर्वांनी जागरुक राहण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, काहीजण मला दहा वर्षात काय केल, अशी विचारणा करतात. पण त्या दहा वर्षात तुम्ही पण सत्तेत होता. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्याच निधीतून आपण विकासकामे केली आहेत. विकास निधीचे पुस्तक विरोधकांना ‘पॅकींग’ करुन पाठविणार आहे. त्यामध्ये सत्य तेच लिहीले आहे. त्यांनी ते वाचले नाही, तरी चाळावे. आपला पक्ष एक होता. सर्वांनी मिळुन काम केले. दिल्लीत मी इथ तुम्ही काम करायचे असं ठरलेच होते ना,वयाचा नात्याचा, पदाचा सन्मान केला,असा टोला सुळे यांनी अजित पवार यांना लगावला. झालं गेले गंगेला मिळाले, चिन्ह का गेले, कस गेले यात मी पडत नाही,असे देखील सुळे म्हणाल्या. यावेळी आमदार रोहित पवार यांनी त्यांच्याकडे नेते, तर आमच्याकडे निष्ठावंत आहेत. ही निवडणुक पवारसाहेब विरुध्द भाजप असल्याचे रोहित पवार म्हणाले