Pune: लोणी काळभोर तहसील कार्यालयासाठी PWDची जागा? प्रस्ताव राज्य सरकारकडे

By नितीन चौधरी | Published: February 20, 2024 04:10 PM2024-02-20T16:10:36+5:302024-02-20T16:10:58+5:30

सध्या या कार्यालयाचा कारभार सध्याच्या हवेली तहसील कार्यालयातूनच सुरू आहे....

PWD seat for Loni Kalbhor Tehsil Office? Proposal to State Govt | Pune: लोणी काळभोर तहसील कार्यालयासाठी PWDची जागा? प्रस्ताव राज्य सरकारकडे

Pune: लोणी काळभोर तहसील कार्यालयासाठी PWDची जागा? प्रस्ताव राज्य सरकारकडे

पुणे : हवेली तहसील कार्यालयाचे विभाजन करून नव्याने तयार करण्यात आलेल्या लोणी काळभोर अप्पर तहसील कार्यालयासाठी लोणी काळभोरमधील सार्वजनिक विभागाची अडीच एकरांची जागा अंतिम होण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळण्याची अपेक्षा असून या कार्यालयासाठी नायब तहसीलदारासह अन्य ९ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. सध्या या कार्यालयाचा कारभार सध्याच्या हवेली तहसील कार्यालयातूनच सुरू आहे.

शहरीकरण वेगाने होत असलेल्या हवेली तालुक्याचे महसुली विभाजन करण्याच्या आठ वर्षांपूर्वीच्या प्रस्तावाला राज्य सरकारने नोव्हेंबरमध्ये मान्यता दिली. त्यानुसार लोणी काळभोर या अप्पर तहसीलदार कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. यात वाघोली, उरुळीकांचन व थेऊर या तीन महसूल मंडळांमधील ४४ गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे या परिसरातील नागरिकांची कामे वेळेत होण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारने या कार्यालयात तृप्ती कोलते पाटील यांची अप्पर तहसीलदार म्हणून नियुक्ती केली आहे. या कार्यालयासाठी अद्याप जागा मिळाली नसल्याने हवेली तहसील कार्यालयातूनच कारभार सुरू आहे.

हे कार्यालय पुणे शहरातील शुक्रवार पेठेत असल्याने लोणी काळभोर परिसरातील नागरिकांना गैरसोयीचे आहे. त्यामुळे हे कार्यालय लोणी काळभोर परिसरात सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे कार्यालय कदमवाक वस्ती गावात सुरू करावे, अशी मागणी पुढे आली आहे. मात्र, येथील जागा गैरसोयीची असल्याचे प्रशासनाने व्यक्त केले आहे. तर दुसरी जागा म्हणून लोणी काळभोर परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाचा पर्याय शोधण्यात आला आहे. ही जागा मध्यवर्ती असल्याने ती मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविल्याची माहिती अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी दिली. हा प्रस्ताव मान्य होईल अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची ना हरकत असल्याचे त्या म्हणाल्या.

दरम्यान, या कार्यालयासाठी आतापर्यंत केवळ अप्पर तहसीलदार व एक लिपीक यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी अधिकारी कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे पाटील म्हणाल्या. त्यानुसार १ नायब तहसीलदार, दोन अव्वल कारकून ४ लिपीक, १ वाहनचालक व १ शिपाई असा आकृतीबंध जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: PWD seat for Loni Kalbhor Tehsil Office? Proposal to State Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.