Asian Games 2018 : आमच्या यशात ‘पीवायसी’चा मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 02:36 AM2018-08-31T02:36:33+5:302018-08-31T02:37:30+5:30

आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे कृतज्ञ उद्गार : अंकिता रैना, ऋतुजा भोसले, शिरीन लिमये सन्मानित

PYC's biggest contribution to our success | Asian Games 2018 : आमच्या यशात ‘पीवायसी’चा मोठा वाटा

Asian Games 2018 : आमच्या यशात ‘पीवायसी’चा मोठा वाटा

Next

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या पाठिंब्यामुळे मी भारावून गेले आहे. मला गरज भासल्यास येथील व्यवस्थापनाने पहाटे ४.३० वाजतासुद्धा मला सरावासाठी क्लबचे दरवाजे खुले केले आहेत. आपल्या देशात खेळाडूंसाठी असे प्रयत्न करणारे फारच कमी क्लब आहेत. हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली १० वर्षांची असल्यापासून मी प्रशिक्षण घेत आहे आणि पीवायसी क्लब हे माझे दुसरे घरच बनले आहे, असे कृतज्ञ उद्गार आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस प्रकारात महिला एकेरीत कांस्यपदक जिंकलेल्या अंकिता रैनाने आपल्या भाषणात व्यक्त केले.

क्रीडाक्षेत्रात शहरांतील अग्रगण्य क्लब असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने इंडोनेशिया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या टेनिसमधील कांस्यपदक विजेती अंकिता रैना, टेनिसपटू ऋतुजा भोसले आणि बास्केटबॉलपटू शिरीन लिमये या तीन खेळाडूंचा राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तीन खेळाडूंसह प्रशिक्षक हेमंत बेंद्रे, सुवर्णा लिमये, टेक्निकल आॅफिशियल अवनी गोसावी आणि खेळाडूंचे पालक यांचा पीवायसी क्लबच्या सभासदांतर्फे क्लबचे मानद सचिव कुमार ताम्हाणे, खजिनदार आनंद परांजपे, शिरीष करंबळेकर, विनायक द्रविड, अतुल केतकर, शशांक हळबे, ज्योती गोडबोले, शैलजा बापट, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी या चारही आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी आपले पीवायसीच्याप्रती आभार व्यक्त केले.

यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेती टेनिसपटू अंकिता रैनाला क्लबच्या वतीने पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सभासदत्व प्रदान करण्यात आले. याआधी क्लबचे सभासदत्व प्रदान करण्यात आलेल्या भारतीय खेळाडू गगन नारंग, पूल्लेला गोपचंद, सायना नेहवाल, पंकज अडवाणी यांच्या यादीत अंकिता रैनाचा समावेश झाला आहे. शिरीन लिमये ही क्लबमध्ये प्रशिक्षक व तिची आई सुवर्णा लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. अंकिता सोबत टेनिस खेळत असलेल्या ऋतुजा भोसले हिने मिळालेल्या पाठिंब्याबद्दल क्लबचे आणि सर्व सभासदांचे आभार मानले. पीवायसी क्लबचे मानद सचिव कुमार ताम्हाणे म्हणाले की, पीवायसी क्लबला आपल्या क्रीडा संस्कृतीचा अतिशय अभिमान आहे आशियाई स्पर्धेत या क्लबचे तीन खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करत असून, हा मान मिळविणारा पीवायसी हा एकमेव क्लब आहे. कोरियातील गेल्या आशियाई स्पर्धेतही पीवायसीच्या तीन खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व केले होते. खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा देऊन असे भविष्यात अधिकाधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ते पुढे म्हणाले की, भविष्यात आगामी होणाऱ्या आॅलिंपिक स्पर्धेत या खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व करावे आणि यासाठी क्लबतर्फे आवश्यक ती मदत या खेळाडूंना करण्यात येईल, असे आम्ही आश्वासन देतो. या वेळी एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, खेळाच्या पाठिंब्यासह पीवायसी हिंदू जिमखानासारख्या क्लबने सर्व खेळाडूंना सर्वोतोपरी पाठिंबा दिला आहे. ही परंपरा कायम ठेवल्यास भारत अधिकाधिक पदके मिळवेल. अभिषेक ताम्हाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
 

Web Title: PYC's biggest contribution to our success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.