गुणवत्तेसाठी पुढाकार
By admin | Published: February 16, 2017 03:22 AM2017-02-16T03:22:09+5:302017-02-16T03:22:09+5:30
भाजपाच्या वतीने ४१ प्रभागनिहाय जाहीरनामे प्रकाशित करून नागरी विकासाचा अजेंडा जनतेसमोर मांडण्यात आला आहे. त्याची
पुणे : भाजपाच्या वतीने ४१ प्रभागनिहाय जाहीरनामे प्रकाशित करून नागरी विकासाचा अजेंडा जनतेसमोर मांडण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यावर पक्षाकडून भर देण्यात येईल. त्यानुसार नागरी जीवनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जातील, असे भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
भाजपाकडून प्रत्येक प्रभागामध्ये विकासाची काय कामे केली जाणार या ४१ प्रभागनिहाय जाहीरनाम्यांचे प्रकाशन सहस्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या. प्रत्येक प्रभागाचे एक पान यानुसार ४१ स्वतंत्र पानांचा जाहीरनामा भाजपाने तयार केला आहे. त्याच्या पहिल्या पानावर त्या प्रभागांमध्ये काय करणार याचे मुद्दे देण्यात आले आहेत, तर त्याच्या पाठोपाठ असलेल्या दुसऱ्या पानावर त्या प्रभागातून पक्षाकडून निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांची माहिती देण्यात आली आहे.
देशातील १२५ शहरांतील महापालिकांपैकी ६८ पालिकांमध्ये भाजपाचे महापौर आहेत. या शहरांमध्ये तिथल्या स्थानिक गरजांनुसार भाजपाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. बेंगलोर, लखनौ, जालंदर, नागपूर या शहरांमध्ये भाजपाचे महापौर असून, तिथे वेगवेगळ्या विकासाच्या योजना राबविण्यात येत आहेत. शहराच्या प्रश्नांवर कल्पक उत्तरे शोधून त्यांची सोडवणूक करावी लागणार आहे, असे विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
योगेश गोगावले म्हणाले, ‘‘भाजपाचा प्रारूप जाहीरनामा प्रकाशित केला, त्याच वेळी प्रत्येक प्रभागनिहाय जाहीरनामा प्रकाशित केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक प्रभागाच्या तिथल्या स्थानिक गरजा, विकासकामांसाठी उपलब्ध असलेल्या जागा लक्षात घेऊन त्यांचा जाहीरनामा करण्यात आला आहे. त्यानुसार सत्तेवर आल्यानंतर इच्छाशक्तीच्या जोरावर ही कामे पार पाडू.’’