अकरावी दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:15 AM2021-09-04T04:15:59+5:302021-09-04T04:15:59+5:30
पुणे : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी शनिवारी (दि. ४) जाहीर होणार आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना ...
पुणे : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी शनिवारी (दि. ४) जाहीर होणार आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना ४ ते ६ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. पहिल्या पर्यायाचे महाविद्यालय जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असल्याचे शिक्षण संचालक डी. जी. जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
पहिल्या प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३१ ऑगस्टपासून दुसऱ्या फेरीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. पुणे आणि पिंपरी शहरातील ३१५ कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशासाठी नोंदणी केलेली आहे. यात १ लाख १२ हजार ७२५ प्रवेश क्षमता आहे. प्रवेशासाठी आतापर्यंत ८३ हजार ८०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील ७५ हजार ९१७ विद्यार्थ्यांचे भरलेले अर्ज लॉक झाले आहेत. त्यातील ७५ हजार ५१६ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. ६८ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले. ३० हजार ८१५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून ८१ हजार ९१० प्रवेशाच्या जागा रिक्त आहेत.
दुसऱ्या प्रवेश फेरीसाठीही विद्यार्थ्यांना अर्ज अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर शुक्रवारी डेटा प्रोसेसिंगचे काम केले. शनिवारी या फेरीची गुणवत्ता यादी सकाळी १० वाजता https://pune.11thadmission.org.in या संकेतस्थळावर जाहीर करणार आहे. यात कट ऑफही जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशाचे ‘एसएमएस’ही पाठविण्यात येणार आहेत. प्रवेश निश्चित करण्यासाठी ६ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.