पुणे महापालिका शाळांची गुणवत्ता ढासळतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 08:54 PM2019-06-18T20:54:47+5:302019-06-18T20:55:11+5:30
सर्वसामान्य कुटुंबातील पालकांना महागडे शिक्षण परवडत नाही आणि महापालिकेच्या शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळत नाही...
पुणे : महापालिकेच्या शाळा सुरु झाल्या तरी विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश मिळाले नाही, अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाही, शिक्षक वेळेवर येत नाहीत, वर्ग खोल्या, स्वच्छता गृहाची दुरवस्था झालीय, पिण्याच्या पाण्याची सोय नाही अशी या अनेक कारणांमुळे महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता ढासळतच चालली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील पालकांना महागडे शिक्षण परवडत नाही आणि महापालिकेच्या शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळत नाही, मग या नागरिकांनी आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचारच करायचा नाही का, असा सवाल मुख्य सभेत प्रश्न उत्तराच्या तासामध्ये सदस्यांनी उपस्थित केला. यावर येत्या महिन्याअखेरपर्यंत सुमारे २५० हून अधिक शिक्षक नव्याने भरती होणार असून, गुणवत्ता सुधारण्यासाठी नवनवीन प्रयोग करण्यात येतील, असा खुलास महापालिकेच्या शिक्षण प्रमुख मिनाक्षी राऊत यांनी केला.
महापालिकेच्या मुख्य सभेत प्रश्न उत्तराच्या तासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका प्रिया गदादे यांनी महापालिकेच्या शाळांची दुरवस्था व ढासळत असलेली गुणवत्ता यावर प्रश्न उपस्थित केला. सोमवार पासून महापालिकेच्या शाळा सुरु झाल्या शिक्षकासोबत लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांचे स्वागत केले. परंतु अनेक शाळांमध्ये पहिल्याच दिवशी शिक्षक उपस्थित नव्हते, महापालिकेच्या शाळांचा दर्जा घसरत असल्याने विद्यार्थी शाळा सोडून खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेतात. पट संख्या कमी होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांचे दाखल अडविले जातात, परंतु शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याची खंत गदादे यांनी व्यक्त केली.
दरम्यान उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी देखील महापालिकेच्या शाळांबाबत, शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या पदामुळे चिंत्ता व्यक्त केली. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त असून, भरती कधी करणार याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. तर नगरसेविका सायली वांजळे, सचिन दोडके, राजाभाऊ लायगुडे यांनी आपल्या मतदार संघातील महापालिकेच्या शाळांचा दर्जा खूपच चांगला असून, प्रवेशासाठी पालकांना प्रतिक्षा करावी लागते. परंतु विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने वर्ग खोल्या आणि शिक्षकांची संख्या कमी पडत असून, तातडीने वाढ करण्याची मागणी केली. सायली वांजळे यांनी आपल्या प्रभागामध्ये प्रस्तावीत रमेश वांजळे ई -लर्निंग शाळेसाठी ७ कोटी निधीची गरज असून, हा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी महापौराकडे केली.
याबाबत खुलास करत राऊत यांनी महापालिकेच्या शाळांमधून दाखला घेतल्यानंतर अनेक पालक विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी प्रवेश घेत नाहीत. यामुळे शाळाबाह्य मुलांची संख्या वढते, हे टाळण्यासाठी दाखले देण्यावर काही निर्बंध घालण्यात आले होते. परंतु दाखल्यासाठी पालकांची अडवणूक होणार नसल्याचे स्पष्ट केले. तर मराठी माध्यमासाठी ९० आणि इंग्रजी माध्यमासाठी १९० शिक्षकाची भरती प्रक्रिया सुरु असून, महिन्याअखेरपर्यंत रुजू होतील. यामुळे रिक्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागले, असे स्पष्ट केले.