पिंपरीत ४१ डॉक्टर व कर्मचारी क्वारंटाईन; अपघातासाठी उपचार घ्यायला आलेला रिक्षा चालक कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 04:14 PM2020-04-06T16:14:59+5:302020-04-06T16:28:35+5:30
खडकीतील एक रिक्षा चालक ३१ मार्च रोजी अपघात झाला म्हणून उपचार घेण्यासाठी डॉ. डी. वाय पाटील रूग्णालयात आला होता...
पिंपरी : अपघातात जखमी झालेल्या रिक्षा चालकांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी रूग्णालयात आणले असताना तपासणीत संबंधित व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील रूग्णालयातील ४१ डॉक्टर, सहायक डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले आहे. रविवारी एनआयव्हीकडे संशयितांच्या घशातील द्रवाचे नमुने पाठविले आहेत. त्याचा अहवाल आज अपेक्षित आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.
पिंपरीतील संत तुकारामनगर येथे डॉ. डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे. या रूग्णालयात दि. ३१ मार्च रोजी खडकीतील एक रिक्षा चालक अपघात झाला म्हणून उपचार घेण्यासाठी डॉ. डी. वाय पाटील रूग्णालयात आला होता. त्यावेळी त्याच्यावर शस्त्रक्रिया करायची असल्याने त्यांना पहिल्यांदा तातडीक वॉर्डात दाखल करून घेण्यात आले. त्यानंतर त्याचा फिटनेस तपासण्यात आला. भूलतज्ज्ञ, सोनोग्राफी, ऑपरेशन थिएटर अशा विविध विभागात नेण्यात आले. शस्त्रक्रियेपूर्वी त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागला म्हणून त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयाच्या माध्यमातून पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविण्यात आले. त्यानंतर एनआयव्हीचा अहवाल शनिवारी (दिनांक ३ मार्च ) रात्री अकराला आला. त्यात संबंधित रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
* ४१ जणांचे घश्यातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी
रूग्णालयातील रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बाब महापालिका प्रशासन आणि रूग्णालय प्रशासनास कळल्यानंतर तातडीने रूग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टर, सहकारी डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी अशा एकुण ४१ जणांचे घश्यातील द्रवाचे नमुने रविवारी एनआयव्हिकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यांचा अहवाल आज सायंकाळपर्यंत अपेक्षीत आहे.
* रूग्णालयाचे निर्जुंतीकरण
दरम्यान रूग्णालयाचे निर्जुंतीकरण करण्यात आले असून रूग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांना क्वारंटाईन केले आहेत. एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविलेले अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना सोडून देण्यात येईल, असे महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, डीवाय पाटील रूग्णालयात उपचारासाठी आलेला रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने रूग्णाच्या संपर्कात आलेले डॉक्टर, परिचारिका आणि रूग्णालयीन स्टाफ यांची तपासणी केली आहे. निजुर्तीकरण केले आहे. सर्व दक्षता घेतल्या असून सर्वांना कॉरंटाईन केले आहे. त्यांचे अहवाल आज सायंकाळपर्यंत अपेक्षित आहेत.
डॉ. डी. वाय पाटील विद्यापीेठाचे कुलपती डॉ. पी. डी पाटील म्हणाले, अपघात झाला म्हणून संबंधित रूग्ण उपचारासाठी आला होता. रूग्णसेवेसाठीच आमचे रूग्णालय आहे. शस्त्रक्रियेपूर्वी तपासणी केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर दक्षता म्हणून रूग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टर कर्मचाऱ्यांना रूग्णालयातच क्वारंटाईन केले आहे.