पुणे शहरातील वृध्दाश्रम 'क्वारंटाईन' ; 'सोशल डिस्टन्सिंग' चेही काटेकोरपणे पालन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 07:00 AM2020-04-12T07:00:00+5:302020-04-12T07:00:16+5:30
पुण्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय..
राजानंद मोरे-
पुणे : कोरोना विषाणुची लागण होऊन मृत्यू पावलेल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. युरोपमधील ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्या अनेक संस्थांना कोरोनाचा विळखा पडला आहे. यापार्श्वभुमीवर शहरातील वृध्दाश्रमांनी कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून स्वत:हून सर्व ज्येष्ठांना क्वारंटाईन केले आहे. आश्रमात येण्या-जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवांसाठी दरवाजे उघडले जातात. तसेच आश्रमात सोशल डिस्टन्सिंग चा नियम काटेकोरपणे पाळत कोरोनाला दूर ठेवले जात आहे.
पुण्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. वयोमानामुळे तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच इतर आजारांमुळे कमी झालेली प्रतिकारशक्ती त्यास कारणीभुत आहे. जगभरात हेच चित्र दिसून येत आहे. प्रामुख्याने युरोपमध्ये ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्या अनेक संस्थांमधील ज्येष्ठांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनेही यासंदर्भात जगभरात कोरोनाबाधित देशांना विविध सुचना केल्या आहेत. पुणे शहर व परिसरामध्ये सुमारे ९० वृध्दाश्रम आहेत. त्यामध्ये दीड ते दोन हजार ज्येष्ठ असण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर या आश्रमांमध्ये विशेष काळजी घेतली जात आहे. यासंदर्भात काही आश्रमांना प्रशासनाकडून सुचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच सर्दी, खोकला, ताप याबाबत विचारणाही केली जात आहे. पण एवढ्यावरच न थांबता आश्रम व्यवस्थापनाने पुर्णपणे दक्षता घेत आश्रम क्वारंटाईन केले आहेत.
जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. विनोद शहा म्हणाले, कोरोनाचा ज्येष्ठांना अधिक धोका असल्याने आमचा २०० जणांचा आश्रम पुर्णपणे क्वारंटाईन करण्यात आला आहे. बाहेरच्या कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. तसेच ज्येष्ठांच्या नातेवाईकांनाही भेटण्याची परवानगी नाही. कर्मचाऱ्यांच्या येण्याजाण्यावरही बंधने आणली आहेत. त्यांना मास्क बंधनकारक आहे. दैनंदिन उपक्रमही कमी केले आहेत. खोलीतील दोन खाटांमधील अंतरही वाढविण्यात आले आहे. ज्येष्ठांच्या काळजीसाठी दिवस-रात्र एक डॉक्टर असतात.
शहराच्या मध्यवस्तीत असलेला निवारा आश्रमही २२ मार्चपासूनच क्वारंटाईन करण्यात आला आहे. आश्रमाबाहेरून कोणालाही आत येण्याची परवानगी नाही. कर्मचाऱ्यांनी सतत ये-जा करू नये म्हणून त्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. ज्येष्ठांचे मनोरंजनासाठी अंतर्गत उपक्रम सुरू असले तरी 'सोशल डिस्टन्सिंग' चा नियम पाळला जातो. महापालिकेकडून केवळ एकदाच सर्दी, तापाबाबत विचारणा करण्यात आली, असे येथील स्वयंसेवकांनी सांगितले. या आश्रमात १३८ ज्येष्ठ नागरिक आहेत. शहरात कोरोना रुग्ण आढळून आल्यापासून सर्व वृध्दाश्रमातील नवीन प्रवेश बंद करण्यात आले आहेत. कोणत्याही वृध्दाला आश्रमात घेतले जात नाही, असेही त्यांनी सांगितले.
-------------
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वृध्दाश्रमांमध्ये सर्वप्रकारची दक्षता घेतील जात आहे. तसेच शहरातील जवळपास ३० आश्रमातील लोकांनी व्हाट्स अँप च्या माध्यमातून व्यासपीठ तयार केले आहे. त्यामध्ये कोणती काळजी घ्यावी, अडचणी यासंदर्भात माहिती दिली जाते. त्यांच्यापर्यंत मदत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडेही विविध साधनसामुग्री मिळण्याबाबत मागणी केली आहे.
- डॉ. अमर शिंदे, प्रमुख, जागृती पुनर्वसन केंद
--------
औषधे, भाजीपाला, अन्नधान्याच्या पुरवठ्याचे आव्हान
काही वृध्दाश्रमातील ज्येष्ठांना लागणारी औषधे तसेच डायपर्स संपत असतात. लॉकडाऊनमुळे ती वेळेत मिळण्यात अडचणी येत आहेत. तसेच आता भाजीपाला व भुसार बाजार बंद झाल्याने अडचणी निर्माण होणार आहेत. याबाबत नियोजन केले जात असले तरी एवढ्या लोकांचे साहित्य उपलब्ध करणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे यासंदर्भात राज्य शासनाने आश्रमांच्या गरजांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. विनोद शहा व डॉ. अमर शिंदे यांनी सांगितले.
--------------------