नाकाबंदीत अडविल्यामुळे पोलीस अधिकार्यांंसोबत हुज्जत; पिंपरीतील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 07:12 PM2021-05-17T19:12:34+5:302021-05-17T19:13:08+5:30
मी पत्रकार आहे. मी लॉ केले आहे. तुम्ही माझी गाडी अडवू शकत नाही म्हणत पोलिसांशी हुज्जत
पुणे : मोटारीतून पाच व्यक्तींना घेऊन जाणार्याला नाकाबंदीत थांबवून चौकशी केल्याचा राग आल्यामुळे दोघांनी सहायक पोलीस निरीक्षकासोबत हुज्जत घातली.
याप्रकरणी खडक पोलिसांनी श्रीराम अशोकसिंग परदेशी (वय ३६), जतीन कुंदन परदेशी (वय २१, दोघे रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजता फडतरे चौकात घडली. परदेशी हे एका कारमधून ५ जणांसह जात होते. फडतरे चौकात त्यांना विशेष पोलीस अधिकार्याने अडविले. त्यांना थांबून घराबाहेर पडण्याचे कारण विचारले असता त्याने गोसावी यांच्यासोबत हुज्जत घालून अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मी पत्रकार आहे. मी लॉ केले आहे. तुम्ही माझी गाडी अडवू शकत नाही, असे म्हणून तुम्ही कसली कारवाई करता, असे म्हणून तुमच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करतो, असे म्हणाला. गोसावी हे त्याला समजावून सांगत असताना जतीन परदेशी याने व्हिडिओ शुटींग करण्यास सुरुवात केली. तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा करुन गर्दी जमवून पोलिसांचे विरुद्ध घोषणाबाजी केली. तसेच व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचे विरुद्ध बोलून सरकारी कामात अडथळा आणला, म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे अधिक तपास करीत आहेत़