सुनेबरोबर भरचौकात भांडणे; संधी साधून मामा-भाच्यांनीच चोरले घरातील १४ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 04:14 PM2022-05-23T16:14:24+5:302022-05-23T16:14:47+5:30
तब्बल सात महिन्यांनंतर खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून शेजारी राहणाऱ्या मामा-भाच्यांनीच ही चोरी केल्याचे उघडकीस आले
पुणे: असे म्हणतात की, चार भिंतीतील भांडणे घराबाहेर जाऊ नयेत. पण, आयुष्यभर पै पै करून साठविलेला पैसा अडका, सोने-नाणे देण्यावरून भरचौकात सुनेबरोबर भांडणे केली. ही भांडणे ऐकणाऱ्या संधी साधून घरातील दिवाणात ठेवलेले १४ लाख ५० हजार रुपयांचे दागिने व रोकड असलेले डब्बे लांबविले. शेवटी तब्बल सात महिन्यांनंतर खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून शेजारी राहणाऱ्या मामा-भाच्यांनीच ही चोरी केल्याचे उघडकीस आले.
वानवडी पोलिसांनी नितीन ऊर्फ दया विश्वास पोळ ( ३३) आणि भाचा साहील खंडू पेठे (२०, दोघे रा. तरवडे वस्ती, हडपसर) यांना अटक केली. त्यांच्याकडून दागिने विकत घेणाऱ्या रोहित संजय पंडित (३७, रा. ससाणेनगर, हडपसर) या सराफालाही अटक केली आहे. याप्रकरणी रंगनाथ सदाशिव शिंदे (५५, रा. साठेनगर, तरवडे वस्ती) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. रंगनाथ शिंदे हे गोंधळी असून, त्यांनी दागिने व रोख रक्कम असा १४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज दोन स्टील डब्यांमध्ये ठेवून ते दिवाणात ठेवले होते.
१६ ऑक्टोबर २०२१ रोजी ते तळ मजल्यावर जेवणासाठी आले असताना चोरट्यांनी हे स्टील डबे चोरून नेले होते. सुनेला हे दागिने देत नसल्याचे तिनेच ते चोरले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला होता. गेले सहा महिने चोरीचा काहीच तपास लागला नव्हता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख व संतोष नाईक यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. शेजारी राहणारा नितीन पोळ हा पैसे उडवत असल्याचे व मोटारसायकल, कार घेतली असल्याची समजले. त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने भाचा साहील पेठे याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. सराफ रोहित पंडित याच्याकडून सहा लाख ४० हजार रुपयांचे १६० ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले. तसेच चोरीच्या पैशांमधून दुरुस्त केलेली मोटारसायकल, कार जप्त केली.
चोरीच्या पैशांमधून पिस्तूल खरेदी
या चोरीच्या पैशांमधून साहील पेठे याने एक पिस्तूल खरेदी केले होते. तसेच त्याने एकाला तुरुंगातून सोडविण्यासाठी एक लाख रुपये दिले होते. पिस्तूल बाळगल्याप्रकरणी साहील याला पोलिसांनी अटकही केली. पण, तेव्हा त्याने काही सुगावा लागू दिला नव्हता.