कात्रज ते देहूरोड महामार्गावर खड्ड्यांची रांग !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 03:05 AM2018-08-25T03:05:06+5:302018-08-25T03:05:54+5:30
कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्गावर कात्रजपासून नवले पुलापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी दीड फूट खोल खड्डे पडलेले असून उताराला त्या खड्ड्यात अडकून अपघात घडत आहेत.
आंबेगाव बुद्रुक : कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्गावर कात्रजपासून नवले पुलापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी दीड फूट खोल खड्डे पडलेले असून उताराला त्या खड्ड्यात अडकून अपघात घडत आहेत. गुरुवारी सौरभ हॉटेलसमोर एका महिलेचा खड्ड्यात गाडी अडकून अपघात झाला. ती गंभीर जखमी झाली. महामार्ग प्रशासनाला या महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे.
महामार्गाच्या डागडुजी व खड्डे बुजवण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे. या मार्गावर काही ठिकाणी एक ते अर्धा फूट खड्डे पडले असून सुसाट येणारी वाहने या खड्ड्यात अडकून साखळी अपघात होण्याचा धोका वाढला आहे. महामार्गावरील आंबेगाव बुद्रुक येथील सौरभ हॉटेलजवळ महामार्गावर खड्डा पडला असून दोन दिवसांपूर्वी या खड्ड्यात दोन दुचाकीस्वार पडून गंभीर जखमी झाल्याचे नागरिकांनी सांगितले. कात्रज देहूरोड महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्या खड्ड्यात वाहनचालकाला खड्डा जवळ आल्याशिवाय दिसत नसल्यामुळे अपघात होत आहेत. वाहनचालक महामार्गावर सुसाट येत असल्याने त्यांना खड्डा दिसताच ते जोरात ब्रेक मारतात. त्यामुळे अपघात घडत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे. कात्रज ते नºहे पुलापर्यंत दोन्ही बाजू महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्या ठिकाणी बरेच लहान-मोठे अपघात घडत आहेत.