पीएमपीएलला अटल सेवेतून सव्वा कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:11 AM2020-12-25T04:11:11+5:302020-12-25T04:11:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: आर्थिक कटकटीत सापडलेल्या पीएमपीएलला दोन महिन्यांपुर्वी सुरू झालेल्या अटल बससेवेने चांगला हात दिला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: आर्थिक कटकटीत सापडलेल्या पीएमपीएलला दोन महिन्यांपुर्वी सुरू झालेल्या अटल बससेवेने चांगला हात दिला आहे. दोन महिन्यांमध्ये या सेवेतून पीएमपीएलला सव्वा कोटी रूपये मिळाले आहेत तर २४ लाख ३३ हजार ५१३ जणांनी या सेवेतून प्रवास केला आहे.
पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी ही माहिती दिली. कोरोना काळात पीएमपीएलची सेवा सलग सहा महिने पुर्ण बंद होती. त्यामुळे आर्थिक संकटाने ही सेवा कोसळण्यासारखी स्थिती झाली होती. आता पीएमपीएल सुरू होऊन तीन महिेने झाले तरीही यात फार मोठा फरक पडलेला नाही. खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ अजूनही बसायला तयार नाही. अशा काळात पीएमपीएलने अटल सेवेतून दोन महिन्यांमध्ये १ कोटी २१ लाख ६७ हजार ५६५ रूपये मिळवले आहेत. त्यामुळे आता आणखी काही मध्यवर्ती थांब्यांवरून ही सेवा सुरू होत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील काही थांब्यांवरून ५ मिनिटात ५ किलोमीटर व फक्त ५ रूपये तिकीट दर ही या अटल सेवेची वैशिष्ट्ये आहेत. लांब पल्ल्याची बस अनेकदा गर्दीमुळे मिळत नाही व एकाच थांब्यावर अडकून पडावे लागते. त्यांच्यासाठी या सेवेतून त्यांना दुसऱ्या थांब्यावर जाऊन ती किंवा दुसरी गाडी पकडता येते. त्यामुळेच या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जगताप यांनी सांगितले.