५ हजाराची सवलत मिळविण्यासाठी गमावले सव्वा लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:09 AM2021-06-17T04:09:34+5:302021-06-17T04:09:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ६० हजार रुपयांचे फर्निचर ५५ हजार रुपयांना विकण्याचा बहाणा करून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ६० हजार रुपयांचे फर्निचर ५५ हजार रुपयांना विकण्याचा बहाणा करून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १ लाख ३२ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी सॅलसबरी पार्क येथील एका ६५ वर्षांच्या नागरिकाने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार देवेंद्रकुमार व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १९ एप्रिलला घडली. ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या साईटबरोबच आता फेसबुकवर देखील जुन्या वस्तूंच्या विक्रीची जाहिरात देऊन नागरिकांना फसविण्याच्या घटना समोर येत आहेत.
फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. त्यांना त्यांच्या फेसबुकवर फर्निचर विक्रीची जाहिरात दिसली. फर्निचर खरेदी करायचे असल्यामुळे त्यांनी समोरील व्यक्तीशी दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला. त्यावेळी त्याने जाहिरातीमध्ये दाखविलेले ६० हजार रुपयांचे फर्निचर ५५ हजार रुपयांना देण्याचे आमिष फिर्यादींना दाखविले. त्यांना पैसे ऑनलाईन पाठविण्यासाठी एक खाते क्रमांक दिला. त्या खात्यावर त्यांना पैसे पाठविण्यास सांगितले. फर्निचर पाठविण्यासाठी त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. त्यानुसार त्यांनी आणखी पैसे पाठविले. वेगवेगळी कारणे सांगून आरोपींनी फिर्यादीकडून १ लाख ३२ हजार रुपये घेतले. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचे फर्निचर पाठविले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर करत आहेत.