कालवा दुर्घटनेतील रहिवासी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 01:54 AM2018-10-03T01:54:22+5:302018-10-03T01:54:57+5:30
पटर्वधन शाळेत ना अंघोळीची सोय ना रात्री झोपण्यासाठी सुरक्षित ठिकाण : प्रशासनाने शाळेत दोन हॉल उपलब्ध करून केले हात वर
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : कालवा दुर्घटनेतील कुटुंबांसाठी महापालिकेच्यावतीने पटवर्धन शाळेतील दोन हॉल निवाऱ्यासाठी उपलब्ध करून दिले खरे; पण गेल्या सहा दिवसांपासून ना येथे अंघोळीची सोय आहे ना महिलांना कपडे बदलण्याची सोय, रात्री झोपण्यासाठी सुरक्षित ठिकाण. एक-दोन दिवसांत रात्री झोपेत बाधित कुटुंबातील महिला, मुलींच्या अंगावर काही मद्यपींनी चपला भिरकावल्याच्या घटना घडल्याचे सांगितले. यामुळे अखेर अनेक कुटुंबांनी महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी आपल्या नातेवाईकांकडे आसरा घेतल्याचे वास्तव समोर आले आहे.
गुरुवारी (दि. २७) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास दांडेकर पुलालगत मुठा उजव्या कालव्याला भगदाड पडले. कालवा फुटल्याने पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता, की यामध्ये कालव्याच्यासमोरील दांडेकर वसाहती व लगतच्या वस्तीत पाणी शिरले. घरा-घरांत पाणी शिरून घरातील टीव्ही, फ्रीज, कपाट, गॅस सिलिंडर या जड वस्तूंसह काडी काडी करून उभा केलेला संपूर्ण संसार, कपडे, अंथरुण, पांघरूणदेखील वाहून गेले. यामध्ये तब्बल ९८ कुटुंबांना राहण्यासाठी घराचे छपर व जमीनदेखील शिल्लक राहिली नाही. पुरामुळे या कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले आहेत. कालवा फुटल्यानंतर तातडीने प्रशासनाकडून तर काही मदत मिळालीच नाही. परंतु त्यानंतर केवळ जबाबदारी म्हणून दाखविण्यासाठी पटवर्धन शाळेत या बाधित लोकांची तातपुरत्या निवाºयाची सोय करण्यात आली. पुरामुळे शंभर-दीडशेहून अधिक घरे व तब्बल ३०० ते ३५० लोक बाधित झाले आहेत.
पालिका प्रशासनाने या ३०० ते ३५० लोकांसाठी पटवर्धन शाळेतील दोन हॉल उपलब्ध करून दिले आहेत. प्रशासनाकडून रात्री झोपण्याची, जेवणाची सोय केल्याचे सांगण्यात आले. परंतु या बाधित लोकांमध्ये अनेक महिला, लग्नाला आलेल्या मुली, लहान मुली यांचादेखील समावेश आहे. ऐवढ्या लोकांनी दोन हॉलमध्ये कसे अन् किती दिवस राहायचे, ना येथे अंघोळीची सोय आहे, ना महिलांना कपडे बदलण्याची. त्यामुळे केवळ दोन हॉल उपलब्ध करून व दोन वेळचे जेवण देऊन प्रशासनाने हात वर केल्याचे चित्र आहे.
कपडे मिळाली... भांडी, खाण्या-पिण्याचे काय?
४कालवाफुटीनंतर शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती मदत करण्यासाठी पुढे आले. परंतु यात बहुतेक सर्वांनी कपड्यांचे वाटप केले. परंतु या बाधितामध्ये शंभर कुटुंबांकडे अंगातील कपड्यांशिवाय काहीच शिल्लक राहिले नाही.
४कपडे तर मिळाली, पण किमान संसारोपयोगी भांडी-कुंडी, अंथरुण-पांघरूण कसे उभे करायचे, असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. यामध्ये बाधितांना एका कुटुंबाला दोन-दोन ताट देण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे पुढे काय, असा मोठा गहन प्रश्न उभा राहिला आहे.
४पालिका प्रशासनाने पटवर्धन शाळेत तातपुरत्या स्वरुपाच्या निवाºयांची सोय केली आहे. परंतु येथील असुविधा लक्षात घेता अनेक कुटुंबांनी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या आपल्या नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे.
४यामुळे दांडेकर वस्तीलगत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाणे शक्य होत नाही. याबाबतदेखील प्रशासनाकडून कोणत्या ही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे काही बाधितांनी सांगितले.
किती दिवस याच्या-त्याच्या घरात आसरा घेणार?
कालवाफुटी दुर्घटनेत दांडेकर वसाहतीमधील तब्बल ९८ झोपड्या भुईसपाट झाल्या आहेत.
या बाधित कुटुंबांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने ३ कोटींची मदत
जाहीर केली.
पालिका प्रशासन, पालकमंत्र्यांनी पुनर्वसन करणार असल्याचे जाहीर केले. यात प्रकल्पग्रस्तांना रोख स्वरुपात मदत करायची की एसआरएमध्ये घरे बांधून द्यायची, याबाबत कोणताही निर्णय झाला नाही.
प्रशासनाची बाधिताबाबत अतिसंवेदनशीलता पाहता याबाबत तातडीने निर्णय होईल, असे
दिसत नाही. त्यामुळे आणखी किती दिवस याच्या-त्याच्या घरात आसरा घ्यायचा? असा सवाल बाधितांनी उपस्थित केला आहे.