दापोडीत भाजी मंडईचा प्रश्न गंभीर
By admin | Published: May 29, 2017 02:36 AM2017-05-29T02:36:11+5:302017-05-29T02:36:11+5:30
दापोडी गावठाणात भाजी मंडई मुख्य रस्त्यावरच भरते. मंडईसाठी पर्यायी जागा नसल्याने गुंता वाढत आहे. मंडईजवळच रेल्वेफाटक
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळे गुरव : दापोडी गावठाणात भाजी मंडई मुख्य रस्त्यावरच भरते. मंडईसाठी पर्यायी जागा नसल्याने गुंता वाढत आहे. मंडईजवळच रेल्वेफाटक आहे. त्यामुळे दररोज सकाळी व सायंकाळच्या वेळी वाहतुकीची समस्या भेडसावत आहे.
पुणे-मुंबई महामार्गावरून दापोडी गावात जाण्यासाठीच्या प्रवेशद्वारापासून ते रेल्वे फाटकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजी मंडई भरते. दापोडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९९७ मध्ये समावेश झाला. तत्पूर्वी १९६७ पासून हे गाव पुणे महापालिकेत होते. तेव्हापासून येथील भाजी मंडईचा प्रश्न सुटलेला नाही. दापोडीत बंदिस्त भाजी मंडईची गरज आहे. वाहनतळासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी.
पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची गरज आहे. वाहतुकीला अडथळा होत असल्याने रस्त्यावर भाजी मंडई नको, असे वाहनचालकांचे मत आहे. यासाठी महापालिकेच्या प्रशासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. दापोडी ते गणेश गार्डन हा उड्डाणपूल झाला असला तरी त्या पुलावर नागरिकांना ये-जा करण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून भाजी मंडईच्या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. लोकसंख्याचे प्रमाण वाढत असतानाही त्या प्रमाणात सुविधांचा आभाव दिसून येत आहे. त्यामुळे रहिवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शितळादेवी चौकातही रस्त्यावरच हातगाडीवाले आपले ठाण मांडतात. जवळच चर्च असल्याने जास्तीची वाहतूककोंडीत भर पडते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व शाळकरी मुलांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या या भाजी मंडई आणि वाहणतळाची समस्या कायमची निकालात काढावी, अशी येथील रहिवाशांकडून मागणी होत आहे.
दापोडीचा समावेश पुणे व नंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत झाला. या दोन्ही महापालिकेकडे भाजी मंडईसाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, प्रश्न सुटलेला नाही. येथून जवळच रेल्वे क्रॉॅसिंग असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे मंडईसाठी महापालिका प्रशासनाने तातडीने जागेची व्यवस्था करावी. मी समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
- माई काटे, नगरसेविका.
दापोडीमध्ये सर्व्हे क्रं. ८५ येथे किरकोळ बाजारासाठी १० गुंठ्याचे आरक्षण आहे. मात्र, ती जागा अद्याप महापालिकेच्या ताब्यात मिळालेली नाही. भाजी मंडईसाठी स्वतंत्र आरक्षण नसून किरकोळ बाजाराच्या आरक्षणात व्यापारी गाळे व भाजी मंडई करणे शक्य आहे.
- राजू बनसोडे, नगरसेवक.
भाजी मार्केटची सोय नसल्याने भाजी विके्रत्यांना रस्त्यावरच बसावे लागते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. ग्राहकांना वावरणे मोठे जिकीरीचे होते. शाळकरी मुलांना ये-जा करणे धोकादायक आहे.
-विजया झाडबुके, ग्राहक
परिसरात भाजी मंडईची सोय नाही. जवळपास पिण्याचे पाणी नाही. स्वच्छतागृहाची सोय नाही. या रस्त्यावरून चारचाकी (मोटारी) वाहनांची वाहतूक बंद करायला हवी. म्हणजे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.
-गोपाळ मोरे, दापोडी.
भाजी मंडईसाठी शिवाजी पुतळ्यासमोर आणि गणेशनगर येथील काटे पेट्रोल पंपाजवळील जागा सुचविण्यात आली होती. त्या जागेबाबत निर्णय झालेला नाही. निर्णय घेतल्याने अनेक प्रश्न सुटणार आहेत.
-अविनाश पांजाळे, फळविके्रता.