गतीशील लोकशाही हा सर्वांत मोठा प्रश्न : गोविंद निहलानी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 08:23 PM2019-01-11T20:23:06+5:302019-01-11T20:24:46+5:30

जसा काळ बदलतो तसे नवनवीन सामाजिक प्रश्न सातत्याने विकसित होत असतात. भारतीय लोकशाही ही स्थिर नव्हे तर ती गतीशील स्वरूपाची  आहे. लोकशाही विकसित होण्याची प्रक्रिया ही निरंतर होत असल्याने काही प्रश्न बदलतात तर काही वगळले जातात

The question is dynamic democracy : Govind Nihalani | गतीशील लोकशाही हा सर्वांत मोठा प्रश्न : गोविंद निहलानी

गतीशील लोकशाही हा सर्वांत मोठा प्रश्न : गोविंद निहलानी

Next

पुणे : जसा काळ बदलतो तसे नवनवीन सामाजिक प्रश्न सातत्याने विकसित होत असतात. भारतीय लोकशाही ही स्थिर नव्हे तर ती गतीशील स्वरूपाची  आहे. लोकशाही विकसित होण्याची प्रक्रिया ही निरंतर होत असल्याने काही प्रश्न बदलतात तर काही वगळले जातात. सध्याच्या काळात आपण लोकशाहीच्या संक्रमणावस्थेतून जात असून, गतीशील लोकशाही हा सर्वांत मोठा प्रश्न आहे, असे सांगत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी नयनतारा सहगल या मुद्यावर थेट भाष्य करणे टाळले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील  ‘पिफ फोरम’चे उदघाटन गोविंद निहलानी आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी निहलानी यांच्याशी संवाद साधला असताना त्यांनी सामाजिक व्यवस्था, असहिष्णुता या मुद्यांवर सावध भूमिका घेतली. कलात्मक लिखाणात लेखकाची स्वत:ची विचारप्रक्रिया फार
महत्त्वाची असते आणि ती कुणीही तुम्हाला शिकवू शकत नाही. तुमच्यातच ती असायला हवी असे ते म्हणाले. निहलानी म्हणाले,  माझा  चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकसित होण्यात ज्येष्ठ नाटककार व लेखक विजय तेंडुलकर यांचा मोठा वाटा आहे. लेखक म्हणून त्यांच्या कामात सखोलता होती. मला तर त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालेच,  भारतीय चित्रपटांसाठी त्यांचे योगदान मोठे आहे. परंतु माझ्या मते त्यांना या माध्यमातून जी जी अपेक्षित ओळख मिळायला हवी होती ती मिळाली  नाही.
              ’गांधी’ चित्रपटाच्या अनुभवाविषयी विचारले असता ते म्हणाले,   रिचर्डअटनबरो यांच्या  ‘गांधी’ चित्रपटसाठी   ‘सेकंड युनिट’ दिग्दर्शक म्हणून माझी निवड होईल असे वाटले नव्हते. तोपर्यंत   ‘आक्रोश’ हा माझा एकच चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु त्यांच्या चमूने माझा चित्रपट
बारकाईने पाहिला होता.  ‘गांधी’साठी काम करताना व्यवस्थापनाचे उत्तम धडेमला मिळाले. या चित्रपटाची पटकथा चित्रपटाच्या प्रत्येक विद्याथर््याने वाचायला हवी. तीन तासांत महात्मा गांधीचे ८० वर्षांचे आयुष्य बसवणे ही सोपी गोष्ट नाही. चित्रपटामध्ये तंत्रज्ञानाच्या वापराबाबत त्यांनी सकारात्मक चित्र मांडले. आता सर्व गोष्टी ‘डिजिटल’ झाल्या आहेत, परंतु बदलते तंत्रज्ञान हे काम अधिकाधिक चांगले व्हावे यासाठीच असते. त्यामुळे आपण ते कायम स्वीकारायला हवे. सुरूवातीला आम्ही  ‘सेल्युलॉईड’ माध्यमात चित्रपट बनवत असू आणि त्या माध्यमात बनलेला चित्रपट  पाहणे हा एक निराळा आणि सुंदर अनुभव होता. तंत्रज्ञान नेहमीच आपल्याला   ‘क्रिएट आॅर पेरिश’ असे आव्हान देत असते. परंतु आताचे नवीन तंत्रज्ञान उत्तम असून प्रतिमानिर्मितीचे नवे आयाम त्यामुळे खुले झाले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: The question is dynamic democracy : Govind Nihalani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.