शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
By admin | Published: June 26, 2017 03:32 AM2017-06-26T03:32:36+5:302017-06-26T03:32:36+5:30
जुन्नर तालुक्यातील कांदळी व वडगाव कांदळी या ठिकाणी तीन आठवड्यात तीन शेतकऱ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळवंडी : जुन्नर तालुक्यातील कांदळी व वडगाव कांदळी या ठिकाणी तीन आठवड्यात तीन शेतकऱ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
जुन्नर तालुक्यात पाच धरणे असल्यामुळे हा तालुका बागायती क्षेत्र असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. या धरणांमधून कालवा व तालुक्यात कुकडी, मीना, मांडवी या नद्यांमधून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. या नद्यांवर अनेक शेतकऱ्यांनी विद्युत पंप बसवून पाणीपुरवठा योजना राबविल्या आहेत. या योजना राबवत असताना शेतकऱ्यांनी पाण्यावर तरफेचा वापर करून पाण्यावर तरंगत्या मोटारी बसविल्या आहेत. जसजसे नदीमधील पाणी कमी कमी होत जाते, तशा मोटारी आपोआप नदीकडेला येत असतात. अशा वेळी शेतकरी ती मोटार पुढे जाण्यासाठी व मोटारच्या फुटवॉलमधील अडकलेला कचरा काढण्यासाठी नदीप्रवाहाच्या पाण्यात उतरतात. अशा वेळी विजेचा शॉक लागून त्यांचा अपघात होतो. अशा घटना गेल्या पाच वर्षांत तीन वेळा घडल्या आहेत. त्यामध्ये कांदळी व वडगाव कांदळी येथील पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे.
गेल्या तीन आठवड्यातच तीन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नदीच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडी व एकांतपणा असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मोटारी व केबल चोरीला जात आहेत.
याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही त्याचा तपास लागत नसल्यामुळे शेतकरी स्वस्तामधील आणि हलका दर्जा असलेल्या केबल वापरत आहेत. या हलक्या दर्जाच्या केबल वापरल्याने या केबल लवकर खराब होतात व त्यामधील वायर उघडी पडून त्याचा शॉक मोटारीच्या लोखंडी साडग्याला लागून अपघात होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वारंवार घडणाऱ्या या अपघातांवर आता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे, हे मात्र निश्चित.