स्वसंग्रहातील दुर्मिळ ठेव्याचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 01:36 AM2018-09-01T01:36:26+5:302018-09-01T01:36:43+5:30
मुंबई दूरदर्शनने कॉपीराईटच्या मुद्द्यावरून नोंदविला आक्षेप
नम्रता फडणीस
पुणे : मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माते अरुण काकतकर यांच्या एकेकाळी दूरदर्शनवर सादर झालेल्या साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमांच्या स्वसंग्रहातील दुर्मिळ ठेव्यावरच कॉपीराईटच्या मुद्द्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या कार्यक्रमांवर मुंबई दूरदर्शनचा हक्क असल्याने सार्वजनिक ठिकाणी या कार्यक्रमांचे परवानगीविना सादरीकरण करता येणार नाही, असा आक्षेप मुंबई दूरदर्शनकडून नोंदविण्यात आला आहे.
तीस ते चाळीस वर्षांपूर्वी विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या मान्यवरांना मुंबई दूरदर्शनवर कार्यक्रमांद्वारे सादर करताना अरुण काकतकर यांनी काहींचे खाजगी रेकॉर्डिंग करून ते जतन केले. या संग्रहात हिराबाई बडोदेकर, मोगुबाई कुर्डीकर, माणिक वर्मा यांनी गप्पा आणि आठवणीतून खुलवलेली मैफल, बाकीबाब, कुसुमाग्रज, शांता शेळके, सुरेश भट या कवींचे मनोगत तसेच मंगेशकर कुटुंबीयांची संवाद आणि गाण्यांची मैफल, राम शेवाळकर, डॉ. जयंत नारळीकर यांची व्याख्याने अशा नानाविध दुर्मिळ गोष्टींचा समावेश आहे.
चित्रफिती आणि श्राव्यफितीचा हा अमूल्य ठेवा डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्त करून टप्प्याटप्प्याने या ठेव्याचे दर्शन रसिकांना घडविण्याचे नियोजन करण्यात आले होते. या सुंदरमालिकेतील ‘शांकुतल ते मानापमान’ हा कार्यक्रम येत्या १ सप्टेंबरला फगर््युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये सादर होणार होता. मात्र मुंबई दूरदर्शनचे सहायक संचालक एम. एस. थॉमस यांनी कॉपीराईटचा मुद्दा उपस्थित करीत या खासगी ठेव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यासंदर्भात त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मेल पाठवल्याने हा कार्यक्रमच रद्द करण्यात आला. मात्र स्वसंग्रही असलेले हे कार्यक्रम दूरदर्शनकडेदेखील नाहीत, असा युक्तिवाद काकतकर यांनी केला आहे. मुंबई दूरदर्शननेच नाटककार सुरेश खरे यांच्याकडे ‘शांकुतल ते मानापमान’ची कॉपी आहे का? अशी विचारणा केली होती.
आपले मूळ स्रोतच त्यांच्याकडे नाहीत, यासारखे दुर्दैव नाही. त्यांच्या संग्रही असलेल्या बऱ्याचशा टेप्स या नष्ट झाल्या आहेत. दूरदर्शनकडे हा ठेवा असेल तर त्यांनी तो दाखवावा. गेल्या तीस ते चाळीस वर्षांत त्यांनी तो का दाखवला नाही? असा सवालही त्यांनी केला. या कार्यक्रमांचे जाहीर सादरीकरण करून पैसे कमावण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दूरदर्शनचे कार्यक्रम शासनाची प्रॉपर्टी
दूरदर्शनचे कार्यक्रम ही शासनाची प्रॉपर्टी आहे, त्यावर मुंबई दूरदर्शनचा कॉपीराईट आहे. कलाकारांना दूरदर्शनच्या खर्चाने बोलावले जाते, त्यामुळे त्या कार्यक्रमांवर दूरदर्शनचाच अधिकार आहे. कार्यक्रमांचे खासगी रेकॉर्डिंग करून ते स्वसंग्रही ठेवले जाऊ शकते. मात्र सार्वजनिक ठिकाणी दूरदर्शनची परवानगी न घेता त्याचे सादरीकरण करणे हा कॉपीराईटचा भंग आहे.
- एम. एस. थॉमस, सहायक संचालक,
व्यवसाय व महसूल विभाग, मुंबई दूरदर्शन