सीलबंद गठ्ठा न दाखविताच वाटल्या प्रश्नपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:18 AM2021-03-13T04:18:39+5:302021-03-13T04:18:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : आरोग्य विभागामार्फत घेतलेल्या परीक्षेदरम्यान कोणतेही संकेत पाळले गेले नाहीत. प्रश्नपत्रिका वाटण्यापूर्वी सीलबंद गठ्ठा दाखविला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : आरोग्य विभागामार्फत घेतलेल्या परीक्षेदरम्यान कोणतेही संकेत पाळले गेले नाहीत. प्रश्नपत्रिका वाटण्यापूर्वी सीलबंद गठ्ठा दाखविला गेला नसल्याचा दावा परीक्षार्थींतर्फे केला आहे. पारदर्शकता पाळली नसल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी परीक्षार्थींकडून करण्यात येत आहे.
आरोग्य विभागामार्फत लॅब टेक्निशियन, आरोग्य सेवक, एक्स-रे टेक्निशियन, फार्मसिस्ट अशा विविध ५४ पदांसाठी २८ फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षा घेतली. त्यात परीक्षेचे संकेत पाळले नाही. प्रश्न आणि उत्तरे असलेली माहिती आधीच काहींना मिळाली असल्याचा आरोप परीक्षार्थींनी केली आहे.
आरोग्य विभागाने निवडलेल्या खासगी कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली. खासगी कंपनीने अपेक्षेप्रमाणे नियोजनात गोंधळ घातला. परीक्षार्थी पाचशे किलोमीटर दूरवरील परीक्षा केंद्रावर हजर झाले. मात्र तेथे त्यांची घोर निराशा झाली. काही ठिकाणी परीक्षार्थी सामूहिकरित्या पेपर सोडवत होते. परीक्षा पद्धतीत पारदर्शकता नव्हती. अैारंगाबाद आणि अहमदनगरमध्ये आधुनिक साहित्याचा वापर करून पेपर सोडविले. त्यामुळे आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून एमपीएससीमार्फत परीक्षा घ्यावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीच्या महेश घरबुडे, पद्माकर होळंबे, गणेश फुटाणे आणि चंद्रशेखर खार्डे यांनी केली आहे.
---
मी मूळचा लातूरचा आहे. मला नागपूर परीक्षा केंद्र मिळाले. तेथे प्रश्नपत्रिका एका प्लास्टिक पिशवीत आणल्या. ते सीलबंद नव्हते. नर्सिंगच्या प्रश्नपत्रिकेत सर्व प्रश्न अग्निशमनबाबत विचारले. आधीच तीन वर्षांनी परीक्षा झाली. त्यातही असा गोंधळ झाल्याने परीक्षार्थी निराश झाले आहेत.
- सचिन लहाने, परीक्षार्थी
---
परीक्षेच्या नियमानुसार मोहरबंद (सील) पाकिटात असलेला पेपरचा गठ्ठा दाखवून दोन परीक्षार्थींची स्वाक्षरी घेणे अपेक्षित होते. मात्र, अशी प्रक्रिया राबविली नाही. पेपर गठ्ठा हा सील केलेला नव्हता. तसेच, नर्सिंगच्या पेपरमध्ये अग्निशमनचे प्रश्न विचारले. काही परीक्षार्थींना उत्तरासह प्रश्नत्रिका आधीच मिळाली होती. त्यामुळे फेर परीक्षा घ्यावी.
- नीळकंठ होळंबे, परीक्षार्थी
---
मी मूळचा जालन्याचा असून, मला अकोल्याचे परीक्षा केंद्र मिळाले. प्रश्नपत्रिका पारदर्शक प्लास्टिक पिशवीत आणल्या. प्रश्नपत्रिकेचा गठ्ठा सील केल्याचे दाखविले नाही. सील उघडताना दोन परीक्षार्थींची स्वाक्षरी घेतली नाही. परीक्षा केंद्रावरील निरीक्षकांच्या गळ्यात ओळखपत्रही नव्हते. पारदर्शकता नसल्याने फेर परीक्षा घेण्यात यावी.
- भगवान भगस, परीक्षार्थी