अधिक उत्पादनामुळे टोमॅटोच्या दराचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:12 AM2021-08-29T04:12:53+5:302021-08-29T04:12:53+5:30
बारामती : दर दोन वर्षांनी टोमॅटोचे उत्पादन देश व राज्यामध्ये अधिक होते. परिणामी दराचा प्रश्न निर्माण होतो. आतादेखील तशीच ...
बारामती : दर दोन वर्षांनी टोमॅटोचे उत्पादन देश व राज्यामध्ये अधिक होते. परिणामी दराचा प्रश्न निर्माण होतो. आतादेखील तशीच परिस्थिती आहे. मात्र केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केलेल्या सूचना अद्याप आमच्यापर्यंत आल्या नाहीत. मात्र त्याची माहिती घेतली आहे. त्याप्रमाणे पणन मंडळ पुढील कार्यवाही करेल, अशी माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बारामती येथे माध्यमांशी बोलताना दिली.
सध्या देशात व राज्यात देखील टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. परिणामी दर नसल्याने अक्षरश: हजारो टन टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याचे वेळ शेतक-यांवर आली आहे. यावर केंद्र सरकाने एमआयएस स्किम अंतर्गत राज्य सरकाने टोमॅटो खरेदी करावेत आणि त्याची विक्री करावी, असा उपाय केंद्राने सुचविला आहे. खरेदी-विक्री व्यवहारात राज्याला जो तोटा होईल त्याची ५० टक्के रक्कम केंद्र सरकार देईल. राज्य सरकारने याबाबत केंद्राला प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी शुक्रवारी (दि.२७) केल्या होत्या. मात्र याबाबत राज्याला अजून काही सूचना आल्या नाहीत, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. तसेच केंद्राने उसाच्या एफआरपीमध्ये ५० रुपयांनी वाढ केली आहे. मात्र मागील दोन वर्षांत महाराष्ट्राने देशाच्या तुलनेत ९८ ते ९९ टक्के एफआरपी ऊस उत्पादकांना दिली आहे, असेही सहकारमंत्री पाटील यांनी सांगितले.