विद्यापीठाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 11:33 AM2019-11-22T11:33:32+5:302019-11-22T11:42:21+5:30
चाकूहल्ला प्रकरण
पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मैदानावर एका तरुणावर व त्याच्या मित्रांवर अनोळखी व्यक्तीने चाकूसारख्या हत्याराने वार केल्याची घटना नुकतीच घडली. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्यापीठ प्रशासनाने याबाबत
गंभीर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
शाहरुख शेख (वय २३ रा. दापोडी) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी एका अनोळखी सायकलस्वार व्यक्तीविरोधात गुन्हा दखल केला आहे. शाहरुख शेख हे त्यांच्या मैत्रिणीसह विद्यापीठाच्या मैदानात गप्पा मारत बसले होते. त्या वेळी या ठिकाणी असणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याबरोबर गैरसमजातून भांडण केले. त्यामुळे शेख यांनी भांडण सोडविण्यासाठी त्यांचा भाऊ अझर शेख व त्याचा मित्र चेतन येडल्लू यांना बोलवले. परंतु, अनोळखी व्यक्तीने या तिघांवर चाकूसारख्या हत्याराने वार करून त्यांना जखमी केले. पोलिसांकडून या अनोळखी व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. विद्यापीठाचा या घटनेशी कोणताही संबंध नाही. फिर्यादी व आरोपी हे सर्व विद्यापीठाबाहेरचे आहेत, असे पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. माळेगावे यांनी सांगितले.
काही वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या आवारात विद्यापीठाच्याच सुरक्षा रक्षकाचा खून झाला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देत विद्यापीठात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. तसेच पोलिसांकडून सुरक्षा ऑडिट करून संरक्षक भिंत बांधून घेतली. तसेच, सुरक्षारक्षकांची संख्या वाढविली. सद्य:स्थितीत विद्यापीठात महत्त्वाच्या ठिकाणी खासगी सुरक्षारक्षक व होमगार्ड नियुक्त केले आहेत. सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे विद्यापीठाच्या सुरक्षेची जबाबदारी दिली आहे.
विद्यापीठातील दोन विद्यार्थी संघटनांमध्ये काही महिन्यांपूर्वी जोरदार हाणामारी झाली होती. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले. त्यातच दोन-तीन दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक ५ मध्ये दोन मद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घातल्याची घटना घडली. त्यामुळे विद्यापीठात बेकायदेशीपणे राहून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाºया विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.
..................
सुरक्षेसाठी सर्वांनी सहकार्य करावे
विद्यापीठाच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने ठोस निर्णय घेतला आहेत. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातून येणाºया प्रत्येकाची चौकशी केली जाईल. त्यानंतरच त्याला विद्यापीठात प्रवेश मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांसह विद्यापीठात काही कामानिमित्त येणाºया व्यक्तींची गैरसोय होऊ शकते.परंतु, विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले आहे.