‘अनधिकृत’चा प्रश्न लवकरच मार्गी
By admin | Published: February 19, 2017 04:47 AM2017-02-19T04:47:45+5:302017-02-19T04:47:45+5:30
दादा आणि बाबा यांच्या जोडीमुळे अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचा प्रश्न सुटला नाही. मात्र, भाजपा सरकारने यावर निर्णय घेतलेला आहे. बांधकामे नियमितीकरणाचा
पिंपरी : दादा आणि बाबा यांच्या जोडीमुळे अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचा प्रश्न सुटला नाही. मात्र, भाजपा सरकारने यावर निर्णय घेतलेला आहे. बांधकामे नियमितीकरणाचा अहवाल न्यायालयासमोर ठेवला आहे. त्यामुळे लवकरच यावर निर्णय होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. तसेच, राष्ट्रवादीचा रिमोट कंट्रोल अजित पवारांच्या हातात आहे आणि त्या फोनमध्ये एक रुपया टाकल्याशिवाय हॅलोचा आवाज येत नाही, अशी टीका मुख्यमंत्री यांनी केली.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘दुपारच्या उन्हात नेते आणि जनता सर्वच जण एकत्र आले आहेत. त्यामुळे महापालिकेत परिवर्तन निश्चित आहे.’’
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामे नियमितीकरण प्रश्नाचे राष्ट्रवादी काँग्रेसला देणे-घेणे नव्हते. या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका आहे. एकीकडे अनधिकृत बांधकामे नियमित व्हावीत, अशी भूमिका मांडते आणि दुसरीकडे अनधिकृत बांधकामे पाडण्याचे टेंडर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने काढले आहे.’’
खासदार अमर साबळे म्हणाले, ‘‘पिंपरीचा कारभारी बदलण्याची वेळ आली आहे. भाकरी फिरविली नाही तर ती करपते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तेची भाकरी फिरवायला हवी.’’(प्रतिनिधी)
पवारांचा रिमोट पब्लिक टेलिफोनसारखा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड महापालिकेवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रिमोट कंट्रोल आहे. मात्र, तो पब्लिक टेलिफोनसारखा आहे. एक रुपयाचे नाणे टाकल्याशिवाय हॅलोचा आवाजच येत नाही. सामान्य नागरिकांसाठी त्याचा उपयोगच झाला नाही. या महापालिकेला केवळ सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून वापरले गेले. पुरेशा प्रमाणात सोयी-सुविधा करता आल्या नाहीत. त्यामुळे बहुतांशी नागरिकांना अनधिकृत घरांमध्ये वास्तव्य करणे भाग पडले.’’
भारतीय जनता पक्षाची विकासाची बॅँक आहे. जनतेची बँक आहे. या बँकेत सामान्य माणसाने मतरूपाने ठेवलेले डिपॉझिट आम्ही पाचपट व्याजासह परत करणार आहोत. आपल्याकडे आणखी काही लोकांच्या बँका आहे. शरद पवार आणि अजित पवारांच्या बँकेत टाकलेले पैसे परत मिळत नाहीत. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची बँक अशी आहे, तिच्या कोठेही शाखा नाहीत. मताचे डिपॉझिट ठेवा. विकास रूपाने व्याज परत करू.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री