कमकुवत पोलीस यंत्रणेमुळे प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2016 01:04 AM2016-01-04T01:04:02+5:302016-01-04T01:04:02+5:30
एका पोलीस दूरक्षेत्रावर व दोन पोलिसांवर २५ ते ३० गावांची जबाबदारी, अनेक दूरक्षेत्रात दूरध्वनीचा अभाव, अपुरे कर्मचारी, बंद पडलेल्या पोलीस व्हॅन यांमुळे फिर्याद दाखल होण्यास ४ ते ५ दिवस
एका पोलीस दूरक्षेत्रावर व दोन पोलिसांवर २५ ते ३० गावांची जबाबदारी, अनेक दूरक्षेत्रात दूरध्वनीचा अभाव, अपुरे कर्मचारी, बंद पडलेल्या पोलीस व्हॅन यांमुळे फिर्याद दाखल होण्यास ४ ते ५ दिवस, तर तपासाला महिनोन्महिने लागतात, अशी अवस्था आहे भोर तालुक्यातील पोलीस ठाण्यांची.
पुणे-सातारा महामार्गावरून वारंवार जाणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, विविध सणांच्या बंदोबस्तासाठी लागणारे पोलीस, यामुळे अगोदरच कमी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. पोलिसांच्या संख्येसंर्दभात आजही ब्रिटिशकालीन नियमांची अंमलबजावणी होत आहे.२०११ च्या जनगणनेनुसार भोर तालुक्यात १९७ गावे व १५५ ग्रामपंचायती असून, सुमारे एक लाख ८२ हजार लोकसंख्या आहे. तालुक्याचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग पडतात. पूर्व भागातून पुणे-सातारा महामार्ग जात असल्याने दररोज तीनचार अपघात घडतात. पेट्रोलपंपावर दरोडे पडतात. हॉटेलसमोर थांबलेल्या गाड्यांमध्ये चोऱ्या होतात. त्यामुळे हा भाग कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील आहे.
महामार्गावर खेडशिवापूर, शिंदेवाडी, राजगड, किकवी ही पोलीस दूरक्षेत्र येत असून, ७० ग्रामपंचायती आहेत, तर भोर पोलीस ठाण्यांतर्गत हिर्डोशी व पसुरे ही दोन पोलीस दूरक्ष्ोत्र आहेत. दोन्ही पोलीस ठाण्यांत कर्मचारी अत्यंत कमी असून, तालुक्यात अचानक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यावर पोलीस पाठवावे लागत असल्याने उपलब्ध पोलीस कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे.
तालुक्याचा पूर्व भाग दुर्गम डोंगरी व दाट झाडी, वर्दळ कमी असल्याने खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या भागाचा सर्रास वापर केला जातो. नीरादेवघर धरण भागात ३१ गावांना हिर्डोशी हे एकमेव दूरक्षेत्र आहे. तेथे दोन हवालदार काम करतात. या भागात दारूचे अवैध धंदे जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक गावात त्याची विक्रीही करतात; मात्र त्याकडे पोलीस काणाडोळा करीत असल्याने गावा-गावांत वादावादी होते. यातून गुन्हेगार निर्माण होत आहेत, तर भाटघर धरण भागात पसुरे हे दूरक्ष्ोत्र असून, २१ गावे संवेदनशील आहेत. या भागातही दोन पोलीस दोन हवालदार काम करतात.पोलीस कर्मचारी कमी असल्याने व स्वत:चे वाहन नसल्याने खासगी वाहनाचा वापर करावा लागतो. पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याबरोबर त्यांना वाहनांची व्यवस्था करणे, नवीन पोलीस
दूरक्षेत्र वाढविण्यासह मंजूर पोलीस दूरक्षेत्र असलेल्या गावात इमारती बांधणे गरजेचे आहे. पोलिसांनी खाकीचा वापर करून प्रामाणिकपणे काम केल्यास सर्वसामान्य
नागरिकांना न्याय मिळणार आहे. मात्र, त्यासाठी पोलिसांच्या प्रमुखांनी पुढाकर घ्यायला हवा, तरच ते शक्य होणार आहे.