Pune : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर तब्बल १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 08:11 PM2022-10-20T20:11:02+5:302022-10-20T20:12:54+5:30
शिक्रापूर-चौफुला दरम्यान तब्बल दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा....
केंदूर (पुणे) :शिक्रापूर-चाकण व पुणे-नगर रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी नेहमी चर्चेचा विषय बनत असताना गुरुवारी पहाटेपासून येथील रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. शिक्रापूर-चौफुला दरम्यान तब्बल दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. दरम्यान, करंदीच्या पोलीस पाटील यांनी स्थानिकांच्या मदतीने वाहतूककोंडी सोडवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
पुणे-नगर महामार्गावर शिरुर तालुक्यात काही तासांसाठी अवजड वाहनांना बंदी केली होती. यांसदर्भात अपवाद वगळात फारसे कोणाला काही माहीत नव्हते. त्यामुळे गुरुवारी पहाटे येथील शिक्रापूर-चाकण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. रस्त्यावर कोठे अपघात झाला असावा असा अंदाज नागरिकांनी व वाहन चालकांनी लावला मात्र काही वेळाने वाहतूककोंडी वाढतच गेली दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी देखील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. काही वेळाने तर चक्क वाहनांच्या दोन्ही बाजूने रांगा लागून पूर्णपणे रस्ताच बंद झाला.
शिक्रापूर नंतर जातेगाव फाटा तसेच पिंपळे जगताप चौफुलापर्यंत वाहतूक जाऊन पोहचली. तर शिक्रापूर चाकण रस्त्यावरील चौफुला येथे करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे, सामाजिक कार्यकर्ते राघू नप्ते, स्वप्नील शेळके, शाम बेंडभर, महेश साबळे, रवींद्र नप्ते यांसह आदींनी रस्त्यावर उतरत वाहतूककोंडी सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. दिवसभर वाहतूककोंडी होत असताना दुपारनंतर काही प्रमाणात वाहतूककोंडी सुरळीत होऊ लागली, तर अनेक वाहन चालकांसह नागरिकांना या वाहतूककोंडीचा सामना करण्याची वेळ आली.
दरम्यान,शिक्रापूर येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्यानंतर शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत वाहतूककोंडी सोडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची चर्चा केली.