फास्टॅगच्या गोंधळामुळे टोलनाक्यावर रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:15 AM2021-02-23T04:15:57+5:302021-02-23T04:15:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरगाव (जि. पुणे) : शनिवार-रविवारची सुटी असल्याने मावळ आणि लोणावळा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. ...

Queues at Tolnaka due to Fastag's confusion | फास्टॅगच्या गोंधळामुळे टोलनाक्यावर रांगा

फास्टॅगच्या गोंधळामुळे टोलनाक्यावर रांगा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरगाव (जि. पुणे) : शनिवार-रविवारची सुटी असल्याने मावळ आणि लोणावळा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे सायंकाळी द्रूतगती मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती. त्यातच उर्से टोलनाक्यावर फास्टॅग स्कॅन होण्यात अडचणी आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

राज्यातील सर्व टोलनाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केला आहे. अनेक वाहनांवर फास्टॅग नसल्यामुळे तसेच ज्या वाहनांवर फास्टॅग होते, पण ते स्कॅन होत नसल्यामुळे सोमाटणे आणि उर्से टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सोमाटणे फाटा चौकातदेखील वाहतूककोंडी झाली होती. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप झाला.

लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे तसेच कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे नागरिक बिनधास्त वावरत आहेत. मुक्त फिरण्यासाठी मावळ पर्यटकांना नेहमीच खुणावते. पुणे व पिंपरीमधून मावळमध्ये फिरायला येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक पर्यटनस्थळे मावळमध्ये आहेत. मावळचे प्रवेशद्वार असलेल्या सोमाटणे फाटा येथे टोलनाक्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. सायंकाळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची रांग ही सोमाटणे फाटा येथील मुख्य चौकापर्यंत गेली होती.

मावळ तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे असल्यामुळे प्रत्येक शनिवार व रविवारी महामार्गावर वाहनांची गर्दी असते. रविवारच्या सुटीच्या दिवशी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. सोमाटणे आणि उर्से टोलनाक्यावर टोलबूथमध्ये वाढ केली आहे. तसेच कर्मचारीही वाढविले आहेत. तरीही वाहनांच्या रांगा कमी झाल्या नाहीत.

फोटो ओळ : सोमाटणे, उर्से टोलनाक्यावर फास्टॅग स्कॅन होण्यात अडचणी आल्याने रविवारी टोलनाक्यावर लागलेल्या वाहनांच्या रांगा.

Web Title: Queues at Tolnaka due to Fastag's confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.