तळेगाव ढमढेरेत लसीकरणासाठी पहाटे चारपासूनच रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:11 AM2021-05-11T04:11:07+5:302021-05-11T04:11:07+5:30
तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी, टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, कासारी, कोंढापुरी, ...
तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी, टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, कासारी, कोंढापुरी, बुरूंजवाडी, शिक्रापूर, सणसवाडी, दरेकरवाडी, कोरेगाव-भीमा, वाडा पुनर्वसन, डिंग्रजवाडी, धानोरे या सोळा गावांतील चार टप्प्यांमधील ४५ वर्षांच्या पुढील ९ हजार १०८ नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली.
अनेक गावांचे वाढते शहरीकरण व औद्योगिक वसाहतीमुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या १६ गावांची लोकसंख्या सुमारे दीड लाखापेक्षा जास्त आहे. तरीदेखील प्रशासनाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मिळणारी लस फक्त २०० च्या दरम्यान उपलब्ध होत असल्याने अनेक नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी दूर अंतरावर येऊन उन्हातानात उभे राहूनही हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे. शुक्रवार दिनांक ७ रोजी फक्त ८० लस उपलब्ध झाली. त्यानंतर सलग दोन दिवस शनिवार, रविवार लसीचा पुरवठा न झाल्याने लसीकरण बंद होते. आज सोमवारी फक्त १८० लस उपलब्ध झाली. सोळा गावांतील नागरिकांनी आज पहाटे चारपासूनच लसीकरणासाठी हजेरी लावल्याने दहा वाजण्याच्या दरम्यान साधारण पाचशे नागरिक लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात आलेले होते. त्यामुळे गोंधळ उडाला. नंबरला उन्हातानात उभा राहूनही अनेकांना लस न घेताच घरचा रस्ता धरावा लागला. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरणासाठी मोठे हाल होत आहेत.
तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राला सोळा गावे जोडली असल्याने दररोज किमान ५०० लस मिळावी अशी नागरिकांची मागणी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राला ज्यादा लसीचा पुरवठा झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहा उपकेंद्रांच्या माध्यमातून ही लस दिली गेल्यास लसीकरणासाठी नागरिकांची गैरसोय होणार नाही.
तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नागरिकांनी केलेली गर्दी.