'भिकाऱ्यांचे डॉक्टर' होण्यासाठी सोडली लाखो रुपयांची नोकरी; एका वाक्यानं आयुष्याला दिली कलाटणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 01:04 PM2023-01-25T13:04:42+5:302023-01-25T13:06:24+5:30
ते अनेकांना भीकमुक्त करून स्वत:च्या पायावर उभे करत आहेत...
पुणे : शाळेतील एक उनाड मुलगा, टपोरीपणा करणारा. त्याच्यासाठी रडत असलेले आई-वडील त्याने पाहिले. 'वेद समजले नाही तरी चालेल, पण वेदना समजावून घे' या एका वाक्याने दिशा बदलली. प्रचंड मेहनत आणि जिद्द उराशी बाळगून शिकला अन् डॉक्टर झाला. या नायकाचे नाव आहे डॉ. अभिजीत सोनवणे, ते आणि त्यांच्या पत्नी डॉ. मनीषा हे दोघेही मागील अनेक वर्षे रस्त्यावरच्या भिकाऱ्यांवर उपचार करत आहेत. अनेकांना भीकमुक्त करून स्वत:च्या पायावर उभे करत आहेत.
रस्त्यावरच्या भिकाऱ्यांचे डॉक्टर ही ओळख कृतीतून मिळाली आणि ते ती अभिमानाने मिरवतात. हे दाम्पत्य 'लोकमत'च्या कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनीच आपली जीवनकहाणी मोजक्या शब्दात सांगितली आणि त्यांच्या कार्याला सलाम करत, 'लोकमत'च्या कर्मचाऱ्यांनीही त्यांना मिळालेली बक्षिसाची रक्कम या दाम्पत्याला सुपूर्द केली.
त्यांची गाडी म्हणजे एक फिरता दवाखानाच...
डॉ. अभिजीत यांनी एका मोठ्या संस्थेत असलेली मोठ्या पगाराची नोकरी सोडली. आता ते पूर्ण वेळ हेच काम करतात. कोणी कुठे दुखऱ्या शरीराने भीक मागताना दिसले की त्यांच्यावर ते उपचार करतात. अर्थातच विनामूल्य. त्यासाठी पडेल तो त्रास सहन करतात. औषधोपचार, आवश्यक असेल तर शस्त्रक्रिया, शारीरिक उपचार व त्याचबरोबर मानसिक उपचारही जातधर्मपंथ ते मानत नाहीत. कोणाच्याही प्रार्थनास्थळाच्या बाहेर बसलेले भिकारी हे त्यांचे हक्काचे रुग्ण असल्याचे ते समजतात. त्यांची गाडी म्हणजे एक फिरता दवाखानाच आहे.
लोकमतच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्पर्धामधील पारितोषिक विजेत्यांना डॉक्टरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या वेळी समूह संपादक विजय बाविस्कर, संपादक संजय आवटे, महाव्यवस्थापक निनाद देसाई तसेच संपूर्ण लोकमत परिवार उपस्थित होता.