मॅडी ‘एफटीआयआय’चा नवा हिरो; कॅज्युअल लुकमध्ये जोरदार एंट्री
By नम्रता फडणीस | Published: October 4, 2023 10:11 PM2023-10-04T22:11:13+5:302023-10-04T22:11:41+5:30
चेअरमन झाल्यानंतर पहिल्यांदाच आर. माधवन कॅम्पसमध्ये : अनेकांनी काढले फोटो, हस्तांदोलनही
नम्रता फडणीस, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : जीन्स, काळा टी शर्ट अन् डोक्यावर नेव्ही ब्लू कॅप अशा पेहरावात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) चे नवनिर्वाचित चेअरमन आर. माधवन यांनी बुधवारी संस्थेमध्ये एंट्री करीत पदभार स्वीकारला. चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या महिनाभरातच त्यांनी एफटीआयआयला पहिल्यांदा भेट देत संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली. गुरुवारी (दि. ५) ते पुण्यात मुक्कामी असून, सकाळी एफटीआयआय स्टुडंट असोसिएशनशी संवाद साधणार आहेत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यांनी संस्थेत प्रवेश केल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपणहून त्यांच्याशी हस्तांदोलन केले, तर काहींनी मोबाइलमध्ये त्यांचे फोटो घेतले.
आर. माधवन हे नाव समोर आले की प्रत्येकालाच 'आरएचटीडीएम' (रहेना है तेरे दिल में) मधील 'मॅडी'ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. बुधवारी कलेच्या प्रांगणात माधवन यांनी कॅज्युअल लूकमध्येच प्रवेश केला. यापूर्वीचे चेअरमन दिग्दर्शक शेखर कपूर यांची लॉकडाऊन काळातच नियुक्ती झाल्याने त्यांना संस्थेमध्ये येण्याची फारशी संधी मिळाली नाही; पण आर. माधवन यांची दि. १ सप्टेंबर रोजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने एफटीआयआयच्या चेअरमनपदी नियुक्ती केली. त्यानंतर महिन्याभरातच त्यांनी संस्थेला पहिल्यांदा भेट दिली. संस्थेमध्ये कोणकोणते विभाग आहेत?, त्याचे कामकाज कसे चालते? याची माहिती त्यांनी जाणून घेतली. तसेच काही विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाददेखील साधला. संस्थेमध्ये त्यांच्या
कॅज्युअल लूकमुळे अनेक चर्चा रंगल्या होत्या.
'मॅडी"च्या उपस्थितीने महिला काॅन्स्टेबलही भारावली
जगभरात आर. माधवन यांचे चाहते आहेत. यात एफटीआयआयमध्ये बंदोबस्तासाठी लावलेल्या महिला काॅन्स्टेबलही अपवाद ठरल्या नाहीत. आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहून त्याही भारावल्या. माधवन यांच्याशी महिला काॅन्स्टेबलची ओळख करून दिल्यानंतर त्यांनी माधवन यांच्याबरोबर फोटो काढला. फोटो काढल्यानंतर त्या महिला काॅन्स्टेबलच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.