जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम चांगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:11 AM2021-02-12T04:11:52+5:302021-02-12T04:11:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम चांगला जाण्याची चिन्हे आहेत. प्रशासनाने केलेल्या पाहणीत सर्व गावांमधील शेतीचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम चांगला जाण्याची चिन्हे आहेत. प्रशासनाने केलेल्या पाहणीत सर्व गावांमधील शेतीचे उत्पन्न अर्ध्यापेक्षा जास्त दिसते आहे.
दुष्काळातील मदत जाहीर करण्यासाठी म्हणून पूर्वी पैसेवारी पाहिली जात असे. मागील १० वर्षांतील सर्वाधिक उत्पन्नाची तीन वर्षे निश्चित करून त्यांच्या सरासरी उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न निघणार असेल तर त्या गावाला दुष्काळी म्हणून जाहीर केले जात असे. आता गावाला दुष्काळी जाहीर करण्यासाठी वेगळे निकष आहेत, मात्र महसूल विभागाच्या वतीने नेहमीप्रमाणे प्रत्येक हंगामाच्या आधी पैसेवारीची पाहणी केली जाते.
दौंड, इंदापूर बारामती हे तीन तालुके पूर्ण रब्बी हंगामाचे आहेत. एकूण तालुके १५ असून या तीन तालुक्यांमधील गावे जमेस धरली तर एकूण ५४३ गावे रब्बी हंगामातील आहेत. गहू, ज्वारी, हरभरा ही त्यातील प्रमुख पिके आहेत. त्याशिवाय फळभाज्या व अन्य पिकेही काही प्रमाणात घेतली जातात. या सर्व गावांची प्रशासनाच्या वतीने पाहणी करण्यात आली. एकाही गावाचे उत्पन्न सरासरीपेक्षा कमी नाही असा या पाहणीचा निष्कर्ष अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी नुकताच जाहीर केला.